ठाणे : भारतीय स्वातंत्र्यलढा, हैदराबाद मुक्ती संग्राम आणि गोवा मुक्ती संग्राम यासारख्या महत्त्वाच्या लढ्यांत योगदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना शासनाकडून मानधन दिले जाते. मात्र, ते जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मिळत असून यापुढे ते शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे कोषागार विभागामार्फत दिले जाणार असून, त्याचा लाभ ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील सुमारे ९० स्वातंत्र्यसैनिकांना मिळणार आहे.राज्यात सन १९६५ पासून स्वातंत्र्यसैनिक मानधन योजना राबविण्यात येत आहे. त्यानुसार, या प्रत्येक स्वातंत्र्यसैनिकाला जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दरमहा १० हजार रुपये अदा केले जातात. २२ जुलै १९८६ पासून बँकेमार्फत मानधन घेण्यास इच्छुक असलेल्या स्वातंत्र्यसैनिकांना बँकामार्फत ते घेण्याचा पर्याय देण्यात आला होता. तथापि, स्वातंत्र्यसैनिक मानधनावर झालेल्या खर्चाची माहिती बँकाकडून जिल्हाधिकारी कार्यालयांना विहीत कालावधीत मिळत नाही. त्यामुळे या खर्चाची एकत्रित माहिती शासनास प्राप्त होत नसल्याने अनेक वित्तीय व प्रशासकीय अडचणी उद्भवतात. याचदरम्यान, शासनाने नवीन जीआर काढून स्वातंत्र्यसैनिकांचे मानधन आणि अन्य सवलती कोषागारांमार्फत देण्याबाबत निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे निवृत्तीवेतन वाहिनी प्रणालीमध्ये ही माहिती भरण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यसैनिक निवृत्तीवेतनाची प्रकरणे हाताळणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. त्यामुळे या स्वातंत्र्यसैनिकांना मिळणारे मानधन लवकरच कोषागार विभागामार्फत दिले जाणार आहे.
आता शासकीय कोषागारातून स्वातंत्र्यसैनिकांना मानधन
By admin | Published: July 27, 2015 3:07 AM