ठाणे : विधानसभा निवडणुकीपूर्वी ‘मी पुन्हा येईन’ अशी आरोळी देणाऱ्या माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आता मी नक्की येईन, अशी नवी आरोळी शुक्रवारी रात्री ठाण्यात ठोकली. त्यांच्या या बोलण्यामागे नेमके गुपित काय, हे मात्र समजू शकले नाही. एकनाथ खडसेंबाबत त्यांना छेडले असता, त्यांनी चक्क हात जोडून बोलण्यास नकार देऊन कार्यक्रमातून रजा घेतली.
ठाण्यातील कोपरी येथे न्यू गावदेवी भाजी मार्केट आणि तारामाउली सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने जनकल्याणार्थी सार्वजनिक सहस्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते ठाण्यात आले होते. मागील वर्षीही फडणवीस येथे दर्शनासाठी आले होते. यंदादेखील शुक्रवारचा मुहूर्त साधून त्यांनी दर्शन घेतले. या वेळी बोलताना त्यांनी, मागील वर्षी आलो होतो, या वर्षीही आलोय. पुढच्या वर्षी बोलवा, मी नक्की येईन, असे विधान करताच उपस्थितांमध्ये खसखस पिकली. परंतु, त्यांच्या या बोलण्यामागे नेमके कारण काय, हे मात्र गुलदस्त्यात असल्याचे दिसून आले.
मी पुन्हा येईन म्हणत फडणवीसांनी शिवसेनेने टाळी नाकारल्याने राष्टÑवादीचे अजित पवार यांची सोबत घेऊन ४८ तासांचे मुख्यमंत्रिपद भूषविले. मात्र, त्यानंतर झालेल्या घडामोडींमुळे त्यांना पुन्हा पायउतार व्हावे लागले. आता पुन्हा सत्तेत येण्यासाठी त्यांच्याकडून किंबहुना भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत. यासाठी शिवसेनेला आणखी एक आॅफरही दिल्याचे वृत्त समोर येत आहे. त्यामुळेच कदाचित मी नक्की येईन, असे तर ते बोलले नसतील ना, अशी चर्चा मात्र यानिमित्ताने केली जाऊ लागली आहे.सिंधी समाजाने केला सत्कारकेंद्र सरकारने भारतीय नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर केल्याबद्दल ठाण्यातील सिंधी समाजाने फडणवीस यांचा सत्कार केला. त्यानंतर, त्यांनी अष्टविनायक चौकातील उत्सवाच्या ठिकाणीही हजेरी लावली.