ठाणे : कोरोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर आली असताना आजही ठाणेकरांना पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध होत नाही. खासगी रुग्णालयात ती मिळत असताना शासकीय केंद्रावर लसीकरणाचा साठाच शिल्लक नसल्याचे वारंवार घडत आहे. त्यामुळे ठाणेकरांचे लसीकरण केव्हा होणार असा सवाल मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी केवळ ठाणेकरांसाठीच लसीकरण उपलब्ध करून देण्याचा ठराव करण्याची मागणी सदस्यांनी केली. त्यानुसार यापुढे ठाणेकरांनाच आधारकार्ड बघूनच लस दिली जाणार असून त्याचा निर्णय अंतिम टप्प्यात असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
स्थायी समितीच्या बैठकीत राष्ट्रवादीचे नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी या मुद्याला हात घालून ठाण्यात आठवड्यातून एक ते दोन दिवसच लसीकरण मोहीम सुरू असते. सर्वसामान्य ठाणेकरांना लस उपलब्ध होत नाही, त्यांना वणवण फिरावे लागत आहे. असे असतांना खासगी रुग्णालयात मात्र लसीकरणाचा साठा उपलब्ध आहे. मग महापालिकेलाच लसीकरणाचा साठा का मिळत नाही असा सवाल केला. त्यातही लसीकरणावर तोडगा काढण्यासाठी ग्लोबल टेंडर काढण्याचा प्रयत्न झाला, परंतु तो प्रयत्नदेखील फसला आहे. त्यामुळे आता ठाणेकरांना लस उपलब्ध करून देण्यासाठी सर्वपक्षीयांनी जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन, तोडगा काढावा अशी मागणी केली. काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनीदेखील केवळ ठाणेकरांसाठीच लसीकरण सुरू ठेवावे, इतर ठिकाणच्या नागरिकांना ठाण्यात लस देऊ नये अशा आशयाचा ठराव करण्याची मागणीही केली. बाहेरचे नागरिक येऊन लस घेऊन जातात, रात्रीपासून रांगेत उभ्या असलेल्या ठाणेकरांना मात्र लस मिळत नसल्याचा आरोप सदस्या मालती पाटील यांनी केला.
यावर आरोग्य विभागाच्या मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. वैजयंती देवगीकर यांनी नवी मुंबईच्या धर्तीवर ठाणेकरांना लस मिळावी या संदर्भात महापौर नरेश म्हस्के यांनी पत्र दिले असल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असेही सांगितले. हा निर्णय झाल्यास आधारकार्ड बघूनच लस दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या संदर्भातील निर्णय अंतिम टप्यात असून लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाईल, असेही त्यांनी सष्ट केले
लसीकरणात दुजाभाव
लसीकरण मोहिमेत दुजाभाव केला जात असल्याचा आरोप यावेळी सदस्य कृष्णा पाटील यांनी केला. आम्ही अर्ज करूनही आमच्या अर्जाचा विचार केला जात नाही. परंतु, दुसऱ्या पक्षाच्या बाजूच्याच नगरसेवकाला लसीकरणाचा स्लॉट उपलब्ध करून दिला जातो. त्यामुळे हा दुजाभाव बंद करण्यात यावा अशी मागणी केली. तसेच एकालाच स्लॉट कसा दिला जातो असा सवालही त्यांनी उपस्थित केला. यावर महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. वैजयंती देवगीकर यांनी आमच्याकडे आलेल्या अर्जावर क्रमानुसार प्रत्येकाच्या अर्जाचा विचार केला जात असल्याचे सांगितले.