कल्याण : डोंबिवलीतील डीएनएस बँक मुख्यालय ते आइस फॅक्टरी हा ३०० मीटरचा रस्ता प्लास्टिकमिश्रित डांबरापासून तयार करण्यात आला आहे. हे काम बुधवारी दुपारी केडीएमसी व रुद्र फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले. प्रायोगिक तत्त्वावरील ही सुरुवात यशस्वी झाल्यास अन्य रस्त्यांसाठीही प्लास्टिकमिश्रित डांबराचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे प्लास्टिकच्या समस्येवर काही अंशी मात करून प्लास्टिकचा पुनर्वापर केला जाणार आहे.
केडीएमसीच्या शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली म्हणाल्या, की पुणे, बंगळुरू, तामिळनाडू येथे प्लास्टिकमिश्रित डांबरी रस्ते तयार केले आहेत. तेथे हे रस्ते तयार करण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरले जाते, त्याची पद्धत काय आहे, याची माहिती देण्यासाठी पुण्याच्या रुद्र फाउंडेशनच्या पुढाकाराने महापालिकेने २३ डिसेंबरला एक कार्यशाळा घेतली होती. त्यानंतर डांबरी रस्ता प्लास्टिकमिश्रित डांबराने तयार करण्याचा प्रायोगिक प्रयत्न केला आहे. सोनारपाडा येथील डीएनएस बँक मुख्यालय ते आइस फॅक्टरी हा रस्ता चांगला टिकला, तर त्याच धर्तीवर अन्य रस्ते केले जातील. हा रस्ता तयार करण्यासाठी ट्रान्सफ्रंट प्लास्टिक पाउच व पिशव्या यांचे तुकडे करून ते डांबरात मिसळले आहेत. त्यामुळे हा रस्ता पावसाळ्यात टिकणार आहे. महापालिका हद्दीतील डांबरी रस्ते पावसाळ्यात जास्त खराब होतात. हा प्रयोग यशस्वी झाल्यास त्याचा अन्य ठिकाणीही वापर केला जाईल. महापालिकेने यापूर्वी रस्त्यांसाठी आॅस्ट्रेलियन तंत्रज्ञानाचा वापर केला होता. तेव्हा ते तंत्रज्ञान फोल ठरले होते. आताही प्लास्टिकमिश्रित डांबराचा वापर कितपत यशस्वी ठरतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.