बदलापूरच्या खरवईजवळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. या जलशुद्धीकरण केंद्राच्या ट्रायल रनचे उद्घाटन आमदार कथोरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. ट्रायल रन झाल्यानंतर आता अधिकृत उद्घाटन करण्याची तयारी शिवसेनेच्या पुढाकाराने करण्यात आली आहे. जलशुद्धीकरण केंद्राचे श्रेय भाजपने घेतल्याने भाजपला शह देण्यासाठी शिवसेनेने आता पाणीपुरवठा मंत्र्यांना उद्घाटनाच्या कार्यक्रमाला बोलावत शासकीय कार्यक्रम आयोजित केला आहे. हा कार्यक्रम शासकीय असला तरी त्याची सर्व तयारी शिवसेनेने केली आहे. ७ सप्टेंबर रोजी दुपारी ५ वाजता या केंद्राचे उद्घाटन होणार असून, त्यासाठी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाची शासकीय पत्रिकादेखील छापण्यात आली असून, त्यात शिवसेनेसह भाजपचे केंद्रीय मंत्री आणि स्थानिक भाजप आमदाराचे नावही टाकण्यात आले आहे. जलशुद्धीकरण केंद्राचे श्रेय घेण्यासाठी स्पर्धा सुरू असताना शिवसेनेने मंत्रिमहोदयांना बोलवत भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.
................
जलशुद्धीकरण केंद्राचे श्रेय लाटण्यात शिवसेनेला कोणताही रस नाही. मात्र कार्यक्रमाच्या निमित्ताने मंत्रिमहोदय बदलापुरात येत असतील तर भविष्यातील ११० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला झुकते माप मिळेल, एवढीच अपेक्षा आम्ही केली आहे.
- वामन म्हात्रे, शिवसेना शहरप्रमुख
-----------
---------------