कल्याण : स्वच्छ भारत अभियानाची जनजागृती करण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिका कंत्राटदार नेमणार आहे. महापालिकेच्या शुक्रवारी होणा-या स्थायी समितीच्या बैठकीत यासंदर्भातील प्रस्ताव घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे सादर केला जाणार आहे. जनजागृतीसाठी महापालिका एक कोटी ३५ लाख ३७ हजार ५३० रुपये खर्च करणार आहे.स्वच्छतेच्या जागृतीसाठी चार निविदा आल्या होत्या. यातील कमी दराची मे. कौटिल्य मल्टीक्रिएशन प्रा.लि. या कंपनीची निविदा स्वीकारण्यात आली आहे. स्वच्छ भारत अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी काही उद्दिष्टे केडीएमसीने समोर ठेवली आहेत. यात घरोघरी ओला व सुका कचरा यांचे वर्गीकरण करण्यासाठी नागरिकांना स्वतंत्र कचरा डबा ठेवण्यास प्रवृत्त करणे, ओल्या कचºयाचे स्थानिक पातळीवर विघटन करण्यासाठी कम्पोस्टिंग ओडब्ल्यूसी मशीनचा वापर करणे, घंटागाडीचा नियमित वापर करून सार्वजनिक ठिकाणच्या कचराकुंड्यांचे प्रमाण कमी करणे, प्लास्टिकचे निर्मूलन करणे, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी स्थानिक नागरिकांचा असलेला विरोध मावळण्यासाठी प्रबोधन करणे, महापालिकेच्या उपाययोजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना देणे, उघड्यावर शौचास बसणाºया नागरिकांमध्ये जागृती करून त्यांना त्यापासून परावृत्त करणे आदींचा समावेश आहे.दरम्यान, आता या अभियानाच्या जागृतीसाठी कंत्राट देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, या अभियानाचा कालावधी १ जानेवारी २०१७ पासून सुरू झाला आहे. त्यामुळे प्रशासनाला उशिरा जाग आली का, असाही सवाल उपस्थित होत आहे.
...आता जनजागृतीसाठीही कंत्राट ,स्वच्छ भारत अभियान : स्थायी समितीच्या आजच्या बैठकीत होणार निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2017 2:57 AM