डोंबिवली : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी मनसेला नितांत आदर आहे. बाळासाहेबांच्या आयुष्यावरील चित्रपट निवडणुकीच्या तोंडावर प्रदर्शित करून शिवसेना त्यांच्या नावावर मते मागू इच्छित आहे. पण, या चित्रपटामुळे सध्याच्या शिवसेनेची पोलखोल होईल. बाळासाहेब हे आक्रमक आणि स्वाभिमानी होते, तर आताची शिवसेना सत्तेसाठी किती लाचार आहे, हा फरक यातून उघड होईल, अशी टीका मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली.शहराच्या पूर्व भागात आदित्य मंगल कार्यालयात शनिवारी सायंकाळी वज्र निर्धार मेळावा झाला. त्यावेळी देशपांडे बोलत होते. या मेळाव्यास मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर, प्रदेश उपाध्यक्ष राजेश मोरे, विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर, महिला आघाडीच्या मंदा पाटील, राहुल कामत, विरोधी पक्षनेते मंदार हळबे, सुदेश चुडनाईक, प्रल्हाद म्हात्रे आणि हर्षद पाटील आदी उपस्थित होते. देशपांडे म्हणाले की, मनसे कार्यकर्त्यांनी केवळ सोशल मीडियावर रिअॅक्ट व पोस्ट टाकण्यापेक्षा प्रत्यक्ष जाऊन त्याठिकाणी काम करावे. महिला व तरुणांनी प्रत्येक घरातून जाऊन मनसेचे काम सांगितले पाहिजे. २०१० मध्ये डोंबिवली-कल्याणमधून २८ नगरसेवक निवडून आले होते. डोंबिवलीतून २० नगरसेवक निवडून आले होेते. या सर्व नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागांत कामे केली. त्याचा प्रचार करण्यात कार्यकर्ते कमी पडले. त्यामुळे पक्षाला २०१५ च्या निवडणुकीत फटका बसला. तेच काम जोमाने करायचे आहे, असे आवाहन देशपांडे यांनी कार्यकर्त्यांना केले.अभ्यंकर म्हणाले की, २०१४ मध्ये मोदी सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. नाशिक महापालिका हद्दीत मनसेने कामे केली. त्याचा अपप्रचार विरोधकांंनी केला. निवडणुकीत भाजपा सरकारने केलेल्या चुकीच्या कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा. मनसेच्या शहराध्यक्षपदावरून दूर केलेले मनोज घरत हे मेळाव्यास उपस्थित नव्हते. ते कामानिमित्त पुण्याला गेल्याचे सांगण्यात आले. पक्षाचे नेते राजू पाटील हेही अनुपस्थित होते.>शहराध्यक्षांचे कौतुकमनसेचे प्रदेश उपाध्यक्ष कदम यांच्याकडे पुन्हा शहराध्यक्षपदाची धुरा पक्षाने दिली आहे. कदम पुन्हा सत्ताधाऱ्यांविरोधात आगळीवेगळी आंदोलने करत आहेत. त्यांचे कौतुक अभ्यंकर आणि देशपांडे यांनी केले. कदम यांच्यासारखे काम प्रत्येक कार्यकर्त्याने केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
आता शिवसेना सत्तेपुढे लाचार : संदीप देशपांडे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 1:27 AM