स्नेहा पावसकर
ठाणे : आपल्या मायबोलीचा प्रत्येकाला अभिमान असतो. कोणी कितीही राष्ट्रीय-आंतरराष्टÑीय भाषा शिकले, तरी मायबोलीतून बोलण्याचा आनंद काही वेगळा असतो. या मायबोलीतून केवळ संवादात्मक बोलणे नाही, तर अनेक गीतेही ऐकायला मिळतात. सध्या सर्वत्र हिट असलेला प्रकार म्हणजे रॅप. हे रॅपसुद्धा आपली मायबोली असलेल्या आगरी भाषेत तयार करून आगरी कोळी भाषेतील पहिला हिपहॉप ईपी ‘कसा काम’ (अल्बम) आणत आहे, तो ठाणेकर आगरी बॉय सर्वेश तरे. आंतरराष्ट्रीय मायबोलीदिनी, २१ फेब्रुवारी रोजी या अल्बमचे प्रकाशन होणार आहे.
महाराष्टÑाला लोकसंस्कृतीचा मोठा वारसा आहे. लोकगीतांचे प्रकारही अनेक आहेत. भारूड, गवळण, पोवाडे इ. यापैकी पोवाड्यांचा वेस्टर्न प्रकार म्हणजे हिपहॉप संस्कृतीतला जणू रॅप. ‘गल्ली बॉय’ सिनेमानंतर भारतात रॅप फेमस झाला आहे. या रॅपमध्ये मुंबईची बम्बईया भाषा मोठ्या प्रमाणात ऐकायला मिळते. मात्र, मुंबईतील हजारो वर्षांपासूनचे स्थानिक असलेल्यांची आगरी कोळी भाषा हीसुद्धा मुंबईची बोलीभाषा म्हणून ओळखली जाते. याच आपल्या आगरी कोळी भाषेत सर्वेश यांनी रॅप असलेला अल्बम तयार केला आहे. त्यात त्यांनी सामाजिक, प्रेम, विरह, संघर्ष असे विषय रॅपमधून हाताळले आहेत. आगरी भाषेत रॅप तयार करण्याचा हा पहिलाच प्रयत्न मी करत आहे. आगरी कोळी बोलीतील गीतांकडे तरुणवर्ग वळावा आणि आगरीतील रॅप संगीत प्रकाराचा रसिकांनी आनंद घ्यावा, म्हणून हा अल्बम तयार करण्याचा प्रयत्न केल्याचे सर्वेश यांनी सांगितले.सर्वेशच्या अल्बममध्ये पाच रॅप गीते आहेत. त्यांच्यासोबत प्रणीत गदमळे, रिद्धेश तरे आणि कवेश हे सहभागी आहेत. याचे संगीत संयोजन धनराज सुरेश देवाडीकर यांनी केले आहे. यापूर्वी माझ्या आगरी लोकगीतांना चांगला प्रतिसाद मिळाला होता, असे सर्वेश यांनी सांगितले.