ठाणे : ठाणे महापालिका शाळांमधील मुलांच्या चांगल्या शिक्षणाची बोंब असताना महापालिकेने डिजिटल वर्गखोल्या करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी सात हजारांचा एक बेंच खरेदी केला जाणार आहे. मुळात महापालिका शाळांतील मुलांशिवाय शिक्षकांना साधे पाढे तरी येतात का, असा सवाल शिवसेनेचे नगरसेवक संजय भोईर यांनी शनिवारी झालेल्या महासभेत केला. यानंतर शिक्षकांचीही गुणवत्ता चाचणी परीक्षा घेतली जाणार असल्याचेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले.
महापालिका शाळांना डिजिटल करण्यासाठी ६.५० कोटींचे बेंचेस खरेदी करण्याच्या प्रस्तावावर चर्चा करताना भोईर यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता आणि शिक्षकांच्या गुणवत्तेचा प्रश्न उपस्थित केला. महापालिकेने शिक्षण घेणाऱ्या पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना गणिताचे पाढे आणि बाराखडीदेखील येत नसल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणले. या विद्यार्थ्यांना शिक्षण देणाºया किती शिक्षकांना गणिताचे पाढे येतात, किती शिक्षकांचे मराठीवर प्रभुत्व आहे, किती जणांना इंग्रजी भाषेचे ज्ञान आहे, असे प्रश्न त्यांनी विचारले. या शिक्षकांना ७० ते ८० हजार रुपये वेतन महापालिका देते. त्याप्रमाणात ते विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करतात का? विद्यार्थ्यांना त्यांच्याकडून व्यवस्थित शिक्षण दिले जात नाही. त्यामुळेच महापालिकेतील शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. तर खाजगी विनाअनुदानित विद्यालयातील शिक्षकांना वेतन कमी असते. परंतु, विद्यार्थ्यांचा शैक्षणिकदर्जा अतिशय चांगला असल्याने महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचा ओढा त्या शाळांकडे असल्याचे भोईर यांनी स्पष्ट केले.महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता तपासली जाते. त्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याकरिता महापालिका वेळोवेळी प्रयत्न करते. मात्र, तरीही ती सुधारत नसल्याने स्वयंसेवी संस्थांमार्फत शिक्षकांची शैक्षणिक गुणवत्ता तपासण्याकरिता त्याची परीक्षा घेतली जाईल, असे आश्वासन शिक्षण विभागाचे उपायुक्त मनीष जोशी यांनी दिले.शाळांच्या दुरवस्थेवर टीकायावेळी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी महापालिका हद्दीतील शाळांच्या दुरवस्थेबद्दल प्रशासनाला धारेवर धरले. प्रथम मूलभूत सुविधा विद्यार्थ्यांना द्या, त्यानंतर डिजिटलचे स्वप्न पाहा, असा सल्लाही सदस्यांनी दिला. विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, शिवसेनेच्या रुचिता मोरे, नरेश मणेरा, पूर्वेश सरनाईक, आशा डोंगरे, मीनाक्षी शिंदे, दीपाली भगत, राष्ट्रवादीच्या अपर्णा साळवी, राधा जाधवर आदींनी चर्चेत भाग घेतला.