सुरेश लोखंडे ठाणे : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या पाहता त्यावर तातडीने औषधोपचार होत आहेत. यासाठी एकाच वेळी रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. रुग्णांचे नातेवाईक डॉक्टरांचे प्रिस्क्रिपशन घेऊन धावपळ करू लागले आहेत. परंतु, आता त्यांना चिंता करण्याची गरज नाही. कोणत्याही रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांस रेमडेसिविरची गरज भासताच संबंधित रुग्णालयाने तेथील महापालिकेच्या वैद्यकीय अधिकार्यांकडे या इंजेक्शनची मागणी नोंदवायची आहे. त्यानुसार महापालिकेकडून जिल्हाधिकारी कार्यालयातील कंट्रोल रूमकडे ती येताच आवश्यक तो पुरवठा जिल्हाधिकारी त्वरित मंजूर करीत असून, रुग्णांना दिलासा देत आहेत.
रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा व काळाबाजार थांबवण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. या नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांनी गेल्या दहा दिवसांत तब्बल ३१ हजार इंजेक्शनचा पुरवठा महापालिकांमार्फत तेथील रुग्णालयांना केल्याचा दावा या नियंत्रण कक्षातील तहसीलदार राजाराम तवटे यांनी केला आहे.
२४ तास रात्रंदिवस चालणाऱ्या या नियंत्रण कक्षाने रविवारी सुटीच्या दिवशीदेखील सात हजार २५ रुग्णांसाठी एक हजार ६२६ रेमडेसिविर इंजेक्शन्स जिल्ह्यातील २५६ रुग्णालयांना पाठविले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे या इंजेक्शनचा पुरवठा झाल्याच्या प्रमाणात दरदिवशी त्वरित जिल्ह्यातील मागणी नोंदवलेल्या रुग्णालयांना पुरवल्या जात आहे. यामुळे आता रुग्णालयांनी मग रुग्णालय कोविडचे असो या नॉन कोविडचे असो, त्यांनी उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांची यादी व त्यांना आवश्यक असलेल्या इंजेक्शनची संख्या बी फार्मच्या नमुन्यात रुग्णालयाच्या नावासह महापालिकेकडे नोंदवायची आहे.
बी फार्मच्या नमुन्यात मागणी नोंदवा
बी फार्मच्या नमुन्यातील सर्व रुग्णालयांची ही मागणी महापालिकेने एकत्रित करून ती ए फार्मच्या नमुन्यात जिल्हाधिकारी कार्यालयातील या नियंत्रण कक्षाकडे ई-मेद्वारे सकाळी १० वाजेपर्यंत पाठवणे आवश्यक आहे. या प्राप्त मागणी पत्रांवर एकमत करून या नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांकडून त्यांच्याकडील इंजेक्शनच्या साठ्याच्या प्रमाणात हा पुरवठा जिल्हा नियंत्रण कक्षाकडून रुग्णालयांना सध्या केला जात आहे. त्यामुळे रुग्णालयांनी आता रुग्णांच्या नातेवाइकांकडून या इंजेक्शनची मागणी करण्याची गरज नसल्याचे तवटे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांनी आता रेमडेसिविरची प्रिस्क्रिप्शन घेऊन मेडिकल शोधण्याची गरज नाही. कोणाला गयावया करण्याची आवश्यकता नाही. या नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनी करण्याची गरज राहिली नाही. आवश्यक असेलच तर या जिल्हा नियंत्रण कक्षात संपर्क करता करता येईल, असे तवटे यांनी रुग्णांच्या नातेवाइकांच्या सोयीसाठी स्पष्ट केले आहे.