ठाणे : प्लास्टिक पिशव्यांवर सतत कारवाईचा दावा पालिका प्रशासन करीत असले तरी आजही शहरात अनेक भागात प्लास्टिक पिशव्यांचा वापर सर्रासपणे सुरू असल्याचा आरोप शुक्रवारी झालेल्या महासभेत लोकप्रतिनिधींनी केला. मार्केट, हातगाड्या, दुकानांमध्ये या पिशव्यांचा वापर सुरू असून प्लास्टिकच्या पिशव्यांविरोधातील कारवाई तीव्र करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी नगरसेवक निधीतून कागदी पिशव्यांची निर्मिती करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. प्रशासनाच्या वतीने मात्र जून २०१८ ते ०९ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत प्लास्टिकविरोधात मोठी कारवाई करून २० हजार ५०० किलोच्या पिशव्या जप्त केल्याची माहिती सभागृहात देण्यात आली. प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आल्यानंतर नागरिकांमध्ये कागदी आणि कपड्यांच्या पिशव्या वापरासंदर्भात जनजागृतीसाठी नगरसेवक निधीमधून निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव महासभेत मंजुरीसाठी आला होता. या अनुषंगाने चर्चा करतांना या कामासाठी निधी देण्यास नगरसेवकांनी कोणत्याही प्रकारची हरकत नोंदवली नसली तरी प्लास्टिकच्या पिशव्यांवर होणारी कारवाई संथ गतीने सुरू असल्याचा आक्षेप नोंदवला. प्रदूषण मंडळाने खरोखरच प्लास्टिक विरोधी मोहिमे तीव्रपणे राबवली असती तर आज ठाणे महापालिका हद्दीत प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी प्रमाणात दिसून आला असता. देशात नोटबंदी होऊ शकते तर ठाण्यात प्लास्टीकबंदी का होत नाही असा सवाल यावेळी नगरसेवक बाबाजी पाटील यांनी केला. तर ठाण्यात अजूनही अनेक ठिकाणी प्लास्टिकचा पिशव्यांचा वापर सर्रासपणे सुरू असल्याची माहिती नगरसेविका शिल्पा वाघ यांनी दिली. वागळे, भाजी मार्केट, उथळसर येथे सर्रासपणे प्लास्टिक पिशव्यांचा वापर दिसत आहे. जोपर्यंत दुकानदारांवर प्लास्टिक विक्रीच्या विरोधात सक्त कारवाई होत नाही तोपर्यंत रस्त्याच्या कडेला उभ्या राहणाऱ्या हातगाड्यांवर सर्रासपणे त्या दिसणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कापडी आणि कागदी पिशव्या तयार करण्यासाठी नगरसेवक निधी देण्यासाठी कोणत्याच नगरसेवकांची काहीही हरकत नसली तरी प्लास्टिकच्या पिशव्या वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार नसेल तर अशा उपक्र मांचा फारसा परिणाम होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.लोकप्रतिनिधींच्या आरोपांना उत्तर देताना पालिका उपायुक्त ओमप्रकश दिवटे यांनी शहरात प्लास्टिकच्या पिशव्यांवर केलेल्या कारवाईची माहिती सभागृहात दिली. प्लास्टीकबंदीच्या शासन नियमानुसार ९ फेब्रुवारी २०१९ पर्यंत सुमारे २० हजार ४५८ किलो प्लास्टीक पिशव्या जप्त केल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी प्रभाग समितीनिहाय पथक नेमले असून या पथकांमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाचा एक अधिकारी दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्लास्टिकच्या वापर करणाऱ्यांवर कारवाई सुरूच असून लोकप्रतिनिधींच्या म्हणन्यानुसार जर प्लास्टिकचा पिशव्यांचा वापर अजूनही काही ठिकाणी सुरू असल्यास कारवाई आणखी तीव्र करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.* नगरसेवक निधीतून कागदी पिशव्यांची निर्मितीप्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर टाळण्यासाठी आणि कागदी तसेच कापडी पिशव्यांचा वापर वाढावा यासाठी या पिशव्या तयार करण्यासाठी नगरसेवक निधी देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. यामध्ये या पिशव्या तयार झाल्यानंतर किफायशीत दारात नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे नमूद केले आहे. या पिशव्या कोण विकणार असा प्रश्न मिलिंद पाटणकर यांनी उपस्थित केला. या पिशव्या नगरसेवकांच्या निधीतून तयार करणार आणि यातून मिळणाऱ्या उत्पन्नाची भर प्रशासनाकडे पडणार. यापेक्षा या कागदीपिशव्यांचे वाटप मोफत करण्याविषयीची सूचना पाटणकर यानी महापौरांना केली. त्यावेळी सभागह नेते नरेश म्हस्के यांनी प्रशासनाच्या गोषवाºयातून किफायतशीर दरात विक्री हा शब्द काढून टाकण्यास सांगितले.
कागदी पिशव्यांच्या निर्मितीसाठी आता केला जाणार नगरसेवक निधीचा वापर, प्रस्ताव महासभेत मंजुर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 4:25 PM
एकीकडे प्लास्टीक पिशव्यांचा वापर आजही सुरु असतांना पालिकेकडून आता कागदी पिशव्यांसाठी नगरसेवक निधीला कात्री लावली जाणार आहे. नगरसेवकांनी याला मंजुरी दिली आहे. मात्र प्लास्टीक पिशव्यांवर कारवाई करा अशी मागणी त्यांनी केली आहे.
ठळक मुद्देप्लास्टीक पिशव्यांवरील कारवाईसाठी नगरसेवक आक्रमककारवाईचा फास आवळणार पालिका