अंबरनाथ : लातूरमध्ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेला ‘पटक देंगे’ अशा शब्दांत आव्हान दिल्याची तीव्र प्रतिक्रिया अंबरनाथमध्ये उमटली असून युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शूटिंग रेंजच्या मंगळवारी होणाऱ्या उद्घाटनाच्या बॅनरवर रातोरात ‘आता निशाणा साधणारच’ असे शीर्षक बदलण्यात आले आहे. हे शीर्षक म्हणजे शहा यांच्या आव्हानाला प्रतिआव्हान असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.
शहा यांनी शिवसेनेला निवडणुकीत ‘पटक देंगे’ असा इशारा दिल्याने शिवसैनिक चांगलेच संतापले आहेत. अंबरनाथमध्ये मंगळवारच्या कार्यक्रमाकरिता लावलेल्या बॅनरवर रातोरात भाजपाच्या इशाºयाला उत्तर देणारे बॅनर लावले आहेत. या बॅनरबाबत कोणीही आक्षेप नोंदवलेला नाही. मात्र, भाजपाचा उल्लेख टाळून शिवसेनेने ही बोचरी टीका बॅनरच्या माध्यमातून केल्याचे भाजपाचे कार्यकर्तेही खासगीत मान्य करत आहेत. शहरात शूटिंग रेंजचे बॅनर या आधीच लावण्यात आले होते. मात्र, शहा यांच्या वक्तव्यानंतर ते बदलण्यात आले. बॅनरवरचा मजकूर हा ठाण्याहून आल्याचे स्पष्ट करण्यात आले. या बॅनरच्या डिझाइनवर स्थानिकांचे फोटो लावून ते शहरभर लावण्यात आले आहेत.निवडणूक पराभवाचा परिणामभाजपा-शिवसेना युतीमधील तणाव वाढू लागला आहे. राम मंदिराच्या मुद्द्यावरून हे पक्ष एकत्र येतील, असे संकेत सरलेल्या वर्षात प्राप्त होत होते. मात्र, तीन राज्यांमध्ये भाजपाला झटका बसताच शिवसेना आक्रमक झाली. त्यातच राम मंदिराच्या मुद्द्यावरून वातावरण तापण्याची चिन्हे दिसत नसल्याने हिंदुत्वावर युती करण्यात ‘राम’ राहिला नसल्याचा साक्षात्कार शिवसेनेला झाला. सेनेकडून नरेंद्र मोदी यांच्यावर वैयक्तिक टीकाटिप्पणी सुरू झाल्याने भाजपाचे कार्यकर्ते अस्वस्थ झाले. त्यातच, ‘चौकीदार चोर है’ या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विधानाची री शिवसेनेने ओढल्याने युतीत बिब्बा पडला.लातूरमध्ये सेनेच्या टीकेला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेच्या सर्वच्या सर्व ४८ जागा लढवण्याची घोषणा केला. त्यापैकी ४० जागांवर विजय प्राप्त होईल, असा दावा फडणवीस यांनी केला.भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मित्रपक्ष सोबत आले तर ठीक, अन्यथा विरोधी पक्षांसोबत त्यांनाही निवडणुकीत ‘पटक देंगे’ म्हणजे धोबीपछाड देऊ, असे सडेतोड वक्तव्य केले.वादाचे पडसाद सेनेत उमटायला सुरुवात झाली. बदलापूरमध्ये लागलेले बॅनर हा त्याच संघर्षाचा परिपाक आहे. अशा बॅनरबाजीमुळे युतीचे कार्यकर्ते बिथरले असून ते युतीला विरोध करतील.