अजित मांडके , ठाणे :ठाणे शहर पोलीस दलातील नौपाडा पोलिसांनी नागरिकांच्या मनातील भीती कमी करण्याबरोबर गोरगरिब नागरिकांसाठी मदतीचा हात देण्याचा सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे. यामध्ये घरातील नको असलेले कपडे, पुस्तक, वही, भांडी, खेळणी आदी वस्तू नौपाडा पोलीस ठाण्याच्या बाहेर ठेवलेल्या बास्केटमध्ये दान करण्याची व्यवस्था तयार केली आहे. ज्या गरजू व्यक्तीला एखादी वस्तू हवी असल्यास त्या बास्केट मधून नेता येणार आहे. अशाप्रकारे माणुसकीच्या भिंतीतून पोलिसांनी 'पोलीस दादा' ही नवीन ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
घरात नको झालेल्या जुन्या वाटणाऱ्या वस्तू काही वेळेस कचऱ्यात जातात. परंतु कचऱ्यात पडलेली वस्तू एखाद्याची गरज होऊ शकते. या पार्श्वभूमीवर गरज वंताची गरज पूर्ण होईल आणि देणाऱ्या व्यक्तीला समाधान मिळेल या दृष्टिकोनातून ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली नौपाडा पोलीस ठाण्यात हा उपक्रम हाती घेतला आहे. नौपाडा पोलिसांनी पोलीस ठाण्याच्या बाहेरच 'पोलीस दादाची माणुसकीची भिंत' असा बॅनर लावला आहे. या ठिकाणी काही बास्केट ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये घरातील जुने कपडे, भांडी, खेळणी, पुस्तके इत्यादी वस्तू ठाणेकर नागरिकांना दान करण्याचे आवाहन केले आहे. तसेच त्या बास्केट मधील कोणती वस्तू एखाद्या गरजू व्यक्तीला हवी असल्यास ही वस्तू घेऊन जाता येणार आहे. असे ही पोलिसांनी म्हटले.
" ठाणे पोलीस सामाजिक सलोखा राखण्यासाठी कायमच तत्पर असून, माणुसकीच्या नात्याने मदतीसाठी कायमच पुढाकार घेतात. त्यातूनच नौपाडा पोलीस ठाण्यात 'पोलीस दादाची माणुसकीची भिंत' हा उपक्रम हाती घेतला आहे. तसेच या परिसरातील नागरिकांना त्यांच्या घरातील नको असणाऱ्या वस्तू बास्केटमध्ये ठेवण्याचे आवाहन केले आहे. या बास्केट मधील वस्तू गरजूला हवी असल्यास ते घेऊन जाण्याचे सांगितले आहे."- रविंद्र क्षीरसागर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नौपाडा पोलीस स्टेशन)