कल्याण : आंबिवली-मोहने येथील एनआरसी कंपनीच्या कामगारांचे थकीत देण्यांसाठी २० दिवसांपासून सुरू असलेल्या धरणे आंदोलनास वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांनी गुरुवारी भेट दिली. कामगारांच्या या लढ्यास ‘वंचित’चा पाठिंबा असून, हा लढा अधिक तीव्र केला जाईल. कामगारांसोबत बैठक घेऊन या प्रकरणी कोणाची भेट घ्यायची हे ठरविले जाईल, अशी ग्वाही आंबेडकर यांनी या वेळी दिली.
या वेळी कामगार संघटनेचे प्रतिनिधी उदय चौधरी, भीमराव डोळ, रामदास वळसे आदी उपस्थित होते. आंबेडकर म्हणाले, पाताळगंगा येथे आयपीएलचा प्लॅण्ट उभारला जातो. दुसरीकडे एनआरसी कंपनी बंद होऊन दहा वर्षे लोटली तरी कंपनीच्या कामगारांची थकीत देणी दिली जात नाहीत. सरकार त्यासाठी काहीच करीत नाही. सरकारचे धोरण कामगारविरोधी आहे. सरकारच्या कामगारविरोधी आणि अन्य नागरिकांच्या विरोधातील धोरणांना जो विरोध करतो, त्याला जेलमध्ये टाकले जाते. ‘एनआरसी’च्या कामगारांची थकीत देणी देण्याऐवजी कामगार वसाहतीत राहणाऱ्यांची घरे तोडून त्यांना बेघर केले जात आहे. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने निकाल देताना कामगारांना त्रास देऊ नका, असे स्पष्ट म्हटले आहे. तरीही पोलिसांना हाताशी धरून घरे तोडण्यात येत आहेत. पोलिसांनी कामगार जात्यात आहेत आणि ते सुपात आहे, असे समजू नये. त्यांच्यावरही अशी वेळ येऊ शकते. कामगारांना त्यांनी कायदेशीररीत्या सहकार्य करावे.
मुंबईपासून ७० किलोमीटरच्या अंतरात कोणतीही कंपनी बंद पडली तर ती पुन्हा सुरू केली जात नाही. सरकारने एनआरसी कंपनी अदानीला विकली. विकलेल्या जागेपैकी बहुतांश जागा ही सरकारची आहे. राज्यात मराठी माणसाचे सरकार आहे, असे असताना कामगारांची देणी न देता जमीन विकली कशी जाते? मात्र, या आधीच्या कंपनी व्यवस्थापनाने हजारो कोटी रुपये कर्ज बँकांकडून घेतले होते. ते कोण चुकते करणार? त्याची हमी अदानीने दिली आहे का, असा सवालही आंबेडकर यांनी केला आहे. राज्यातील एखाद्या उद्योजकाला दिल्लीत मोदींच्या शेजारी बसावे वाटले तर ते होणार नाही. त्याला मोदी बगलेत घेणार नाहीत. मात्र, तोच उद्योजक जर गुजरातचा असेल तर त्याला लगेच मोदी बगलेत घेतील. केंद्रातील सरकार अंबानी, अदानीच्या बाजूचे असल्याचे ते पुढे म्हणाले.
सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
सभेच्या ठिकाणी मोठी गर्दी उसळल्याने तेथे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. आंबेडकरांनी उपस्थितांना गर्दी करू नका. सोशल डिस्टन्सिंग पाळा, असे आवाहन केले. मात्र कार्यकर्ते व उपस्थित त्यांच्या आवाहनाला जुमानत नव्हते. याविषयी आंबेडकर यांनी संतापही व्यक्त केला.
---------------------------