डोंबिवली : मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बार व्यावसायिकांकडून कोरोनाचे नियम सर्रासपणे धाब्यावर बसविले जात आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे न पाळता ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तोकडे कपडे घालून महिलांचा अश्लीलतेचा ‘नंगा’ नाच सुरूच असल्याचे शुक्रवारी (१७)पुन्हा एकदा कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या कारवाईतून उघड झाले.
बुधवारी मोनालिसा बारमध्ये कोरोनाचे नियम धाब्यावर बसविले गेले असताना पुनश्च या हद्दीतीलच लोटस या लेडीज सर्व्हिस बारवर शुक्रवारी टाकलेल्या धाडीत महिला विनामास्क होत्या तसेच तोकड्या कपड्यात ग्राहकांशी अश्लील कृती व हावभाव करताना निदर्शनास आल्या. या कारवाईत संबंधित १० महिला, बार मॅनेजर आणि वेटर असे १२ जण तर १९ ग्राहक अशा ४१ जणांना ताब्यात घेऊन पुढील कारवाई करीता स्थानिक मानपाडा पोलिसांच्या हवाली केले आहे.
हा बार डोंबिवली पूर्वेकडील कल्याण-मानपाडा रोडवर आहे. या ठिकाणी कोरोना नियमांचे उल्लंघन करून गाण्यांवर चाललेल्या महिलांच्या अश्लील हावभाव आणि कृत्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती. त्यानुसार पाटील यांच्या पथकाने संबंधित बारवर छापा टाकला असता हे गैरकृत्य सुरू असल्याचे दिसून आले. तेथील महिलांच्या तोंडावर मास्क ही नव्हते तर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जादेखील उडाला होता. घटनास्थळावरून पोलिसांनी रोकड आणि गाणी वाजविण्याचे साहित्य असा २४ हजार ३९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
-------------------------------
स्थानिक मानपाडा पोलिसांचा कानाडोळा
मागील आठवड्यात कल्याण पूर्वेकडील हाजीमलंग रोडवर असलेल्या मोनालिसा बारमध्ये टाकलेल्या धाडीत बारचालक, मॅनेजर, वेटर महिला व ग्राहक अशा ५६ जणांना ताब्यात घेतले होते. ही कारवाई ताजी असतानाच पुन्हा एकदा लोटस बारवर धाड टाकून त्याठिकाणी सुरू असलेल्या अश्लील हावभाव आणि कृत्याचा पर्दाफाश केला आहे. हे दोन्ही बार मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहेत. परंतु, त्यांच्या हद्दीत सुरू असलेल्या या ‘धिंगाण्या’कडे मानपाडा पोलिसांचा होत असलेला कानाडोळा चर्चेचा विषय ठरला.
-------------------------------------------------------------------------------------