ठाणे : मालमत्ता तसेच पाणीपट्टी वसुलीची जोरदार मोहीम ठाणे महापालिकेने सुरू केली असून, यामध्ये पाणीपट्टी न भरणारे सर्वाधिक थकबाकीदार हे कोपरी, वागळे आणि कळवा, मुंब्रा भागातील असल्याची माहिती समोर आली आहे. पालिकेने थकबाकीदारांवर केलेल्या कारवाईमध्ये कोपरी आणि वागळे पट्ट्यात १०६५, तर कळवा आणि मुंब्य्रात १७६६ पाण्याची जोडणी खंडित केली असून, संपूर्ण महापालिका क्षेत्रात कारवाईची संख्या ३६९० इतकी आहे. राजकीय आशीर्वादानेच एवढ्या मोठ्या संख्येने नागरिक पाणी कर थकवित असल्याचे दिसून आले आहे.
कोरोनामुळे आर्थिक गर्तेत सापडलेल्या महापालिकेला वर काढण्यासाठी पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी वसुलीवर अधिक भर दिला आहे. त्यामुळे उत्पन्नाचे मुख्य स्रोत असलेल्या मालमत्ता पाणीपट्टीवरच पालिकेची मदार असल्याने या दोन विभागाच्या वसुलीवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. नागरिकांनी स्वत:हून पाणीपट्टी भरावी यासाठी सवलतीच्या योजनाही जाहीर केल्या आहेत. याला नागरिकांचाही समाधानकारक प्रतिसाद मिळत आहे. मात्र ज्या थकबाकीदारांनी अद्याप पाणीपट्टी भरलेली नाही, अशांवर कारवाई करण्यास पालिकेने सुरुवात केली आहे.
------------------------
प्रभाग समितीनुसार केलेली कारवाई
कोपरी - २६९
उथळसर - ५७
वागळे - ७६९
लोकमान्य, सावरकरनगर - ३१०
वर्तकनगर - ७०
माजिवडा - मानपाडा - ३३
कळवा - २६५
मुंब्रा - १५०१
दिवा - ३१६
-----------------------------
एकूण - ३६९०