ठाणे : दरवर्षी १० टक्क्यांनी अपघात कमी करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. त्यानुसार, राज्यातील सर्वच यंत्रणा कामाला लागल्या असून ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अपघातांचे प्रमाण हे तब्बल २१ टक्क्यांनी कमी झाले असून, त्यामुळे बळींचे प्रमाण २६, तर जखमींचे प्रमाण १० टक्क्यांनी घटले आहे. शहरी भागात हे प्रमाण १२ टक्क्यांनी कमी झाले आहे. अपघातात बळींची टक्केवारी १३ आणि जखमींची २० टक्क्यांनी कमी झाल्याचे राज्याच्या अहवालातून स्पष्ट होत आहे.राज्यातील रस्ते अपघातांची वाढलेली संख्या लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने सर्वच यंत्रणांना फटकारले आहे. त्यानुसार, सर्वच यंत्रणा रस्ते अपघात रोखण्यासाठी कामाला लागल्या. २०१८ पासून राज्यातील ३४ जिल्हे आणि नऊ शहरे अशा ४३ ठिकाणी एकूण ३५ हजार ७१७ अपघात झाल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामध्ये १३ हजार २६१ जणांचा अपघातात मृत्यू झाला, तर ३१ हजार ३६५ जण जखमी झाले होते. २०१८ च्या तुलनेत २०१९ साली हे प्रमाण आठ टक्क्यांनी कमी झाले. २०१९ मध्ये ३२ हजार ८७६ अपघात झाले असून त्यामध्ये १२ हजार ५६५ जण मृत्युमुखी तर २८ हजार ८९८ जण जखमी झाले आहेत.ठाणे शहरात २०१८ साली ९९० अपघात झाले असून त्यामध्ये २४९ जणांचा मृत्यू, तर ९९८ जण जखमी झाले होते. २०१९ हे प्रमाण कमी झाले. या वर्षात ८७४ अपघातांमध्ये २१७ जणांचा बळी गेला असून ७९४ जण जखमी झाले. टक्केवारीनुसार अपघातांचे प्रमाण १२ टक्क्यांनी कमी झाले. बळींचे प्रमाण १३ आणि जखमींचे प्रमाणही २० टक्क्यांनी कमी झाल्याचे दिसत आहे. ठाणे ग्रामीण भागात हे प्रमाण २१ टक्क्यांनी कमी झाले आहे. ग्रामीण भागात २०१८ मध्ये ८९८ अपघात झाले होते. त्यामध्ये ३०१ जणांचा मृत्यू, तर ६४२ जण जखमी झाले होते. २०१९ मध्ये ७११ अपघात झाले. त्यामध्ये २२२ जणांचा बळी गेला असून ५७६ जण जखमी झाले आहेत.>ब्लॅक स्पॉटकडे यंत्रणांनी केले लक्ष केंद्रितजिल्ह्यात सद्य:स्थितीत असलेल्या १०८ ब्लॅक स्पॉटवर लक्ष केंद्रित करत, ११ यंत्रणांनी त्या स्पॉटवर सुचवलेल्या छोट्यामोठ्या दुरुस्तीची अंमलबजावणी केली आहे.परिणामस्वरुप, एक वर्षात अपघातांची संख्या कमी झाली आहे. त्याचबरोबर अपघातांचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी वाहतूक शाखा आणि आरटीओ विभाग प्रयत्न करत आहे.अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी नागरिकांचीही भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे यासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी रवी गायकवाड यांनी केले आहे.
ठाणे जिल्ह्यात अपघातांबरोबर बळी आणि जखमींचीही संख्या घटली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 12:52 AM