दुसऱ्या लाटेत अंबरनाथ शहरात २०६ रुग्णांचा मृत्यू झाला. शहरातील स्मशानात २०६ कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार केल्याची नोंद असताना आयसीएमआरच्या पोर्टलवर मात्र फक्त ६५ मृत्यू झाल्याची नोंद होती. या तफावतीचा शोध घेण्यासाठी अंबरनाथ पालिका प्रशासनाने शहरातील सर्व खासगी कोविड रुग्णालयांकडून मृतांची यादी मागविली. यावेळी १४१ मृतांची नोंद खासगी हॉस्पिटल्सनी आयसीएमआरच्या पोर्टलवर केलीच नसल्याचे उघड झाले. खासगी रुग्णालयात रुग्णाचा मृत्यू झाल्यावर त्याची नोंद आयसीएमआरच्या पोर्टलवरकरण्याची जबाबदारी ही खासगी रुग्णालयावर होती. मात्र या रुग्णालयांनी शासनाच्या पोर्टलवर नोंद न करता थेट पालिकेकडे दिली होती. त्यामुळे प्रत्यक्ष झालेले मृत्यू आणि शासनाच्या नोंदवहीतील आकड्यांत मोठी तफावत निर्माण झाली.
पालिकेने आता मृत्यूची नवीन आकडेवारी गोळा केली असून त्यात २०६ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यातील ६५ रुग्ण हे पालिकेच्या नोंदीमध्ये दिसत असून उर्वरित १४१ रुग्ण नोंदीमध्ये दिसत नव्हते. अखेर काेणतीही लपवालपवी न करता सर्व आकडे पुराव्यानिशी सादर करण्याचे काम अंबरनाथ नगरपालिकेने केले आहे. त्यामुळे मृत्यूच्या आकड्यांमध्ये थेट १४१ रुग्णांची वाढ झाली आहे.
...
६५ मृत्यूंचा घोळ
याशिवाय ६५ रुग्ण असे आहेत, ज्यांचे आयसीएमआर नंबर नसल्याकारणाने त्यांना कोविड रुग्ण म्हणून मृत घोषित करणे पालिकेला अडचणीचे ठरत आहे. या ६५ रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे झालेला असला तरी, एरव्ही कोरोनाची चाचणी केल्यानंतर जो आयसीएमआर नंबर उपलब्ध होतो, तो तांत्रिक कारणामुळे उपलब्ध न झाल्याने या ६५ मृत्यूंची नोंद कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या यादीत करण्यात आलेली नाही. त्यामुळे ही अडचण दूर झाल्यानंतर १४१ आणि ६५ अशा २०६ मृत्यूंची नोंद वाढणार आहे.
.................