कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली होती. तिला रोखण्यासाठी महापालिका हद्दीत लॉकडाऊन लागू करण्यात आले. लॉकडाऊनदरम्यान रुग्णसंख्या कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात असल्याने महापालिका हद्दीत त्याचा चांगला परिमाण दिसून येत आहे. रुग्णसंख्या कमी होत असून, ही दिलासादायक बाब आहे. रुग्णसंख्या नियंत्रणात आल्यावर लॉकडाऊन शिथिल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महापालिका हद्दीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दिवसाला दोन हजारच्या आसपास कोरोना रुग्ण आढळून येत होते. त्याचबरोबर रुग्णालयात बेड, ऑक्सिजन, इंजेक्शनची उपलब्धता कमी होती. त्यामुळे दुसरी लाट जीवघेणी होती. दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी मार्च महिन्यापासून कडक निर्बंध लागू करण्यात आले. त्यानंतर एप्रिल महिन्यापासून लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे चांगला परिणाम साधला गेला आहे. रुग्णसंख्या कमी होत आहे. महापालिका हद्दीतील ३२ कोरोना टेस्टिंग सेंटरवर दिवसाला ३ हजार ५०० जणांच्या चाचण्या केल्या जात आहेत. सध्या रुग्ण पॉझिटिव्हिटीचा दर १२ टक्क्यावर आला आहे. हाच दर सुरुवातीला २३ टक्के होता. आतापर्यंत आरटीपीसीआर आणि अँटिजन मिळून ६ लाख ८१ हजार २६ जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे.
रुग्ण डबलिंग रेट हा १९० दिवसाचा झाला आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण १.३२ टक्के आहे. रुग्णसंख्या कमी होत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९५ टक्के आहे. त्यामुळे आताच्या घडीला रुग्णांकरिता बेडची उपलब्धता ५० टक्के आहे. ५० टक्के बेडची उपलब्धता असताना आतापर्यंत ४७ हजार ५६३ रुग्णांनी होम आयसोलेशनमध्ये उपचार घेतले आहेत.
चौकट - चाचण्यांसाठी वेळ वाढविली
महापालिका हद्दीत ३२ टेस्टिंग सेंटर आहेत. हे सेंटर यापूर्वी सकाळी १० ते दुपारी २ याच वेळेत सुरू होती. आता हे सेंटर सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. त्याचबरोबर महापालिकेची हेल्थ पोस्ट सेंटर एक ऐवजी दोन शिफ्टमध्ये चालविली जाणार आहे. सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत खुली राहणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी दिली आहे.
चौकट - कोविशिल्ड लसीचे चार हजार डोस प्राप्त
महापालिकेस लसीचे डोस उपलब्ध न झाल्याने शनिवारपासून लसीकरणाची प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. बुधवारी महापालिकेस चार हजार कोविशिल्ड लसीचे डोस उपलब्ध झालेले आहेत. त्यामुळे उद्यापासून लसीकरण सुरू होणार आहे. आतापर्यंत दोन लाख चार हजार नागरिकांना पहिला व दुसरा लसीचा डोस दिला आहे. त्यात पहिल्या डोस घेणाऱ्यांची संख्या जास्त आहे.
चौकट - पहिल्या व दुसऱ्या लाटेत प्रभावित झालेले रुग्ण वयोगटानुसार
शून्य ते ९ वर्षे रुग्ण - ४,२५९
१० ते १८ वर्षे रुग्ण - ७,०३७
१९ ते ४५ वर्षे रुग्ण - ६४,५४४
४५ वर्षांपेक्षा जास्त - ५३,०९०
-----------------