- कुलदीप घायवट
कल्याण : सातासमुद्रापार राहणार्या आपल्या मित्रपरिवाराला, नातेवाईकांना आणि कुटुंबातील व्यक्तीला दिवाळीचा फराळ, भेटवस्तू देऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या जातात. हे साहित्य पोहोचवण्याचे काम कुरिअर कंपनी, टपाल विभाग करते. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील पार्सलची सेवा सुरू आहे. मात्र कोरोनामुळे यंदाच्या पार्सल सेवेत कमालीची घट झाली आहे.
दरवर्षी कल्याण-डोंबिवलीमधून मोठ्या प्रमाणावर परदेशात फराळ पाठवला जातो. परदेशात शिकत असलेल्या किंवा नोकरी करणाऱ्या आप्तेष्टांसाठी कल्याण-डोंबिवलीकर फराळ, भेटवस्तू, पाठवत असतात. मात्र यंदा कोरोनाचा संसर्गाचा धोका टाळण्यासाठी अनेक नागरिकांनी परदेशात पार्सल पाठविले नाही. परदेशात पार्सल पाठवण्याच्या सेवेत टपाल विभागाकडून कोणतीही भाडेवाढ झाली नाही. परंतु, अनेक कुरिअर कंपन्यांनी भाडेवाढ केली आहे. त्यामुळे पार्सलच्या सेवेत घट झालेली आहे.
टपाल विभागातर्फे ८२ देशांमध्ये फराळ, दिवाळी साहित्य आणि भेटवस्तू पाठविली जात आहे. अमेरिका, कॅनडा, युरोपातील जर्मनी, इटली, फ्रान्स, नेदरलँड्स, स्वित्झर्लंड; तसेच आशिया खंडातील श्रीलंका, जपान, चीन, इंडोनेशिया; आफ्रिका खंडातील काही देशांमध्येही वस्तू पाठवण्यात येतात. मात्र कल्याण-डोंबिवलीमधून यू.एस. आणि यु.के. या देशात सर्वाधिक फराळ आणि भेटवस्तू पाठविल्या जातात.
टपाल विभाग एक किलो वजनाप्रमाणे दर आकारून वस्तू किंवा फराळ परदेशात पाठवत आहे. कोरोना काळात देखील ही सेवा सुरू आहे. या काळात कोणत्याही प्रकारचे जादा दर आकारले नसल्याचे, टपाल विभागाकडून सांगण्यात आले.
---------------
दर वर्षीपेक्षा यंदा परदेशात फराळ पाठवणाऱ्या नागरिकांची संख्या घटली आहे. मागीलवर्षीपेक्षा ४० टक्के नागरिकांची घट झाली आहे. कोरोनामुळे नागरिक कोणत्याही प्रकारचा संसर्गाचा धोका टाळत आहेत. कोरोनामुळे कुरिअर कंपन्यांनी पार्सल पाठविण्यासाठी भाडेवाढ केलेली आहे.
-श्रीपाद कुळकर्णी, मिठाई विक्रेते