वज्रेश्वरी : गेल्या काही दिवसांपासून भिवंडी तालुक्यातील सर्व वनपरिक्षेत्रात वणवे लागल्याचे प्रमाण वाढले असून यामुळे शेकडो हेक्टर जंगल जळून खाक झाले आहे, तसेच वनसंपत्तीची हानी झाली आहे.
शिकार, कोळसा मिळविण्यासाठी आणि गवतामधील प्लॉट मोकळे व्हावे आदी कारणांसाठी काही लोक आगी लावत आहेत. परंतु आगींमुळे जंगलातील वनसंपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्याचबरोबर जंगलातील लहान प्राणी, सरपटणारे लहान जीव आदी वन्यप्राणी आणि किमती झाडे यांचा नाहक बळी जात आहे. भिवंडी तालुक्यातील सर्व जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पती आहे. परंतु या आगींमुळे वनस्पती आणि वनविभागाने लावलेली झाडे नष्ट होत आहेत. वनविभागाचे अधिकारी डोंगर भागातील गावांमध्ये जाऊन या प्रकरणी जनजागृती करण्याचे काम करून आग लावणे हा गुन्हा असून शिक्षा होऊ शकते, असे पटवून देऊनही आगी लावण्याचे प्रमाण वाढतच आहे.
पारिवली, पडघा, दुगाड, चिंबीपाडा, पिलंझे, कुहे, दिघाशी, गणेशपुरी, कांबा आदी सर्व वनपरिक्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून आगी लागत आहेत.
दुगाड वनपरिक्षेत्रात वज्रेश्वरी जवळील गुमतारा किल्ला परिसरात दोन दिवसांपूर्वी मोठी आग लागली असता येथील वनपाल सुधीर फडके यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घेऊन रात्री एकपर्यंत आग विझवून आटोक्यात आणली. परंतु वन कर्मचारी यांच्याकडे आगी विझविण्यासाठी पुरेशी साधने नसल्याने आणि डोंगराच्यावर उपलब्ध साधने नेऊ शकत नसल्याने त्यांच्यावर मर्यादा येत आहेत. यामुळे नागरिकांनीच जागरूक राहून आगी लावणाऱ्यांची माहिती वनविभाग अथवा पोलिसांना देऊन सहकार्य केल्यास आगी लावण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल असे वनविभागाकडून सांगण्यात येत आहे.