- अजित मांडकेठाणे : कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. मतदारनोंदणीचे दोन्ही टप्पे पूर्ण झाल्यानंतर मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळी मतदारांची संख्या सुमारे २० हजारांनी घटल्याचे दिसून आले आहे. नव्याने निर्माण झालेल्या पालघर जिल्ह्यातील मतदारांची नोंदणी अपेक्षेपेक्षा जास्त असून कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात गतवेळेपेक्षा तीन हजार अतिरिक्त मतदार नोंदले आहेत. मात्र, ठाणे व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील मतदारांची संख्या घटली आहे.जुलै महिन्यात कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अपेक्षित आहे. या निवडणुकीत उमेदवारीची माळ आपल्या गळ्यात पडून निवडून येण्याकरिता मतदारनोंदणीच्या माध्यमातून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातील मतदारांची संख्या वाढण्याची अपेक्षा होती. परंतु, तसे घडलेले नाही. मागील निवडणुकीत एक लाख नऊ हजार मतदार होते. यावेळी हीच संख्या ९० हजारांच्या घरात आली आहे. निवडणूक आयोगाकडे करण्यात आलेल्या तक्रारीनंतर तसेच न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर या मतदारसंघातील आधीची यादीच रद्द करण्यात येऊन नव्याने मतदारनोंदणी करण्यात आली. आधीच्या यादीत काहींची नावे ही दुबार होती, तर काही बोगस नावांचा त्यात समावेश होता.ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांचा यात समावेश आहे. पहिल्या टप्प्यातील नोंदणीत सुमारे ४८ हजार मतदारांची नोंदणी झाली. दुसºया टप्प्याची नोंदणी २१ डिसेंबरला पूर्ण झाली. १९ जानेवारीला या दोन्ही टप्प्यांची यादी जाहीर झाली. त्यानुसार, आता मतदारांची संख्या सुमारे २० हजारांनी घटली असून केवळ ९० हजार २५२ मतदारांची नोंद झाली आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत १८ हजार ७४८ एवढे मतदार घटले आहेत.दरम्यान, १९८८ पासून ते मागील निवडणुकीपर्यंत कोकण पदवीधर मतदारसंघावर भाजपाचेच वर्चस्व राहिले आहे. २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे निरंजन डावखरे यांना २७ हजार ६३३ मते मिळाली होती. तर, भाजपाचे संजय केळकर यांचा पराभव झाला. त्यांना दुसºया क्रमांकाची मते मिळाली. राष्टÑवादीने तिकीट नाकारल्याने निलेश चव्हाण यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. परंतु, ऐनवेळेस त्यांना मनसेने पाठिंबा दिला होता. मनसेची साथ मिळूनही त्यांना तिसºया क्रमांकाची मते मिळाली होती.मतदारांची संख्या वाढण्याऐवजी घटली१९८८ मध्ये या मतदारसंघाची निर्मिती झाली. तेव्हा चार जिल्ह्यांत सहा हजार मतदार होते. पहिल्या निवडणुकीत भाजपाचे वसंतराव पटवर्धन यांनी बाजी मारली. १९९४ च्या निवडणुकीत मतदारसंख्या १२ हजारांवर आणि २००० मध्ये १८ हजारांवर गेली. या दोन्ही निवडणुकांत भाजपाचे अशोक मोडक यांनी बाजी मारली. २००६ मध्ये भाजपाचे संजय केळकर विजयी झाले. त्यांचा दोन हजार मतांनी विजय झाला होता. त्यांच्यासमोर राष्टÑवादीचे निलेश चव्हाण रिंगणात होते. तेव्हा मतदारांची संख्या ६६ हजारांवर गेली होती. त्यानंतर, २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत मतदारांची संख्या एक लाख नऊ हजारांवर गेला. परंतु, यंदाच्या निवडणुकीत मतदारांची संख्या घटून ९० हजार २५२ झाली आहे.मतदारांची नोंदणी करण्याची अंतिम तारीख २१ डिसेंबर होती. दोन टप्प्यांत नोंदणी करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाकडून अधिकाºयांना देण्यात आल्या होत्या. परंतु, जूनपर्यंत आलेले मतदारांचे अर्ज स्वीकारावे, अशा सूचनादेखील निवडणूक अधिकाºयांना करण्यात आल्या आहेत. परंतु, त्यांच्याकडे लेखी स्वरूपात तसे कोणतेही आदेश न आल्याने मतदारांची नोंदणी प्रक्रिया थांबली असल्याचे आक्षेप आता घेतले जात आहेत.ठाणे जिल्ह्यातील मतदारांमध्ये मोठी घटमागील निवडणुकीत सर्वाधिक ठाणे जिल्ह्यातील मतदार होते. त्यांची संख्या ६६ हजार ४८० एवढी होती. परंतु, यंदा मात्र त्यामध्येच सर्वात मोठी घसरण झाली असून आता मतदारांची संख्या ३७ हजार २५४ एवढीच नोंदली आहे. त्याखालोखाल सिंधुदुर्गातील मतदारांची असलेली ६२ हजार ४६ संख्या घटून जेमतेम चार हजार ५८७ वर आली आहे. रायगडमधील २४ हजार १५८ मतदारांची संख्या ही १७ हजार ७६९, रत्नागिरी १२ हजार ४६५ मतदारांची संख्या वाढून १५ हजार ५०७ वर गेली आहे. नव्याने तयार झालेल्या पालघर मतदारसंघात तब्बल १५ हजार १३५ मतदारांची नोंद झाली आहे.
कोकणातील पदवीधर मतदारांची संख्या २० हजारांनी घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 2:42 AM