डोंबिवली : आगरी समाजाचा एकमेव खासदार ही बाब समाजासाठी भूषणावह नाही. समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी समाजाच्या खासदारांची संख्या वाढली पाहिजे. राजकीयदृष्ट्या समाज प्रबळ झाला पाहिजे, असे आवाहन खासदार कपिल पाटील यांनी रविवारी येथे केले.आगरी यूथ फोरमने येथील क्रीडासंकुलात भरवलेल्या आगरी महोत्सवाचे उद्घाटन रविवारी खासदार पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी आमदार नरेंद्र पवार, उपमहापौर उपेक्षा भोईर, उद्योगपदी शंकर भोईर, माजीमंत्री जगन्नाथ पाटील, नगरसेविका प्रमिला चौधरी, सुनीता पाटील व आयोजक गुलाब वझे आदी उपस्थित होते.खासदार पाटील म्हणाले की, ‘आगरी समाजाचा एकमेव खासदार हे काही समाजाचे भूषण नाही. समाजाचे अनेक लोकप्रतिनिधी विविध पदांवर निवडून आल्यास समाजाचे प्रश्न सुटण्यास मदत होईल. मग कोणाची आगरी-कोळी समाजावर अन्याय करण्याची हिंमत होणार नाही. आगरी समाजाची ओळख काय तर माणुसकी आणि जिव्हाळा. तर, दुर्गुण काय तर तो कोणाची लवकर स्तुती अथवा कौतुक करीत नाही. चांगल्या कामाचे कौतुक केले पाहिजे. समाजाने धनाएवजी वैचारिकदृष्ट्या श्रीमंत झाले पाहिजे. आगरी महोत्सवावर काहींनी टीका केली आहे. माणूस मोठा झाल्यावरच तो टिकेचे लक्ष्य होतो. आगरी समाज जोपर्यंत या भूतलावर आहे, तोपर्यंत महोत्सव होतच राहील.’आमदार पवार म्हणाले, ‘आगरी समाजाचे एकमेव खासदार पाटील यांना केंद्रीय मंत्रीपद देण्याची मागणी आगरी-कोळी समाजातर्फे आगरी यूथ फोरमने केल्यास ती मागणी सरकारकडे लावून धरली जाईल.’ उपमहापौर भोईर म्हणाल्या, ‘आगरी समाजात मुलीच्या जन्माला खूप महत्त्व आहे. बेटी ही धनाची पेटी समजली जाते. ‘बेटी बचाव’ ही मोहीम केंद्र सरकार राबवत असले तरी आगरीसमाज पूर्वापारपासून बेटी बचाव करीत आहे.’ माजीमंत्री पाटील म्हणाले, ‘महोत्सवाचे हे १६ वे वर्ष आहे. सोळावं वरीस धोक्याचे असे म्हणतात. त्यानुसार समाजातील व्यक्तींकडून आयोजनाविषयी टीका झाली. या अर्थाने सोळावे वरीस धोक्याचे आहे.’‘२७ गावांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करावी, गावांतील घरांची बंद केलेली नोंदणी पुन्हा सुरू करावी. कल्याण ग्रोथ सेंटर आणि कल्याण-शीळ रस्त्याचे सहापदरीकरण करताना भूमिपूत्रांवर अन्याय होऊ नये, याचा पुनर्रुच्चार वझे यांनी केला. महोत्सवावर टीका करणाऱ्या कोण्या एका व्यक्तीला हिशेब देण्यासाठी आगरी यूथ फोरम बांधील नाही. आगरी समाजाशी आमची बांधिलकी आहे, असे वझे यांनी ठासून सांगितले. दरम्यान, ‘कणसा’ या स्मरणिकेचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते झाले. साहित्यिक सुरेश देशपांडे व त्यांच्या सहकाºयांनी त्याचे संपादन केले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद पाटील यांनी केले.लवकरच बैठकआगरी-कोळी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत मंत्रालयात बैठक घेतली जाईल. भूमिपूत्रांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही खासदार पाटील यांनी यावेळी दिली.दरम्यान,उद्घाटन सोहळ्यांनंतर विविध गटांतील मुलांनी नृत्याविष्कार सादर केले.
आगरी समाजाच्या खासदारांची संख्या वाढली पाहिजे- कपिल पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 11:33 PM