ठाणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नव्या रुग्णवाढीचा वेग हा इतका जास्त होता की, अवघ्या ५० दिवसांत ठाणे जिल्ह्यात तिने दोन लाखांचा आकडा पार केला. यामध्ये पहिले एक लाख रुग्ण हे २० दिवसांत तर दुसरे एक लाख रुग्ण हे पुढील ३० दिवसांत नोंदवले गेले आहेत. मात्र, लॉकडाऊनमुळे परिस्थिती नियंत्रणात आल्याचेही गेल्या काही दिवसांतील रुग्णसंख्येच्या आकडेवारी दिसत आहे.
या ५० दिवसांत वाढलेली रुग्णसंख्या प्रामुख्याने ठाणे आणि कल्याण डोंबिवली या दोन महापालिकांमध्ये जास्त आहे. दोन लाख रुग्ण संख्येपैकी एक लाख रुग्ण संख्या ही ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीतील असल्याचे शासकीय आकडेवारी स्पष्ट दिसत आहे. दुसऱ्या लाटेत या दोन्ही महापालिकांमध्ये रुग्णवाढीची जणू स्पर्धाच पाहण्यास मिळाली.
ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या ही २०११ मध्ये झालेल्या जनगणनेनुसार एक कोटी १० लाख ५४ हजारांहून अधिक आहे, तर जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण ८५ टक्के इतके आहे. तसेच सहा महापालिका आणि दोन नगरपालिका तसेच जिल्हा परिषदही अस्तित्वात आहे. शहरी आणि ग्रामीण अशा दोन भागात जिल्हा विभागाला गेला आहे. अजून ही शहापूर आणि मुरबाड या तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी वस्त्या आहे, तर शहरी भाग हा दाटीवाटीने पसरलेला आहे. त्यातच परराज्यातून आलेल्या लोकांची संख्या ही जास्त असून नोकरदारांची संख्या अधिक आहे. नोकरीधंद्यासाठी ठाणे, दिवा, डोंबिवली, कल्याण, बदलापूर या ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात (लाखोंनी) नागरिक लोकलने दररोज ये-जा करतात. त्यामुळे रेल्वे असो या एसटीस्थानके गर्दीने नेहमी गजबजलेली असतात. २०२० च्या मार्च महिन्यात ठाणे जिल्ह्यात कोरोनाने शिरकाव केला. त्यानंतर रुग्ण जरी वाढले गेली असली तरी, तो वेग अगदी कमी होता. ११ जुलै रोजी जिल्ह्याची रुग्णसंख्या ही ५० हजार झाली आणि अवघ्या ३० दिवसांत म्हणजे १२ ऑगस्टला तीच रुग्णसंख्या एक लाखांवर पोहोचली. १९ ऑक्टोबरला तिने दोन लाखांचा टप्पा पार केला. याचदरम्यान दुसऱ्याची लाटेची भीती व्यक्त होत असताना रुग्णसंख्या कमी झाल्याने जवळपास कोरोना संपला की काय, असे वाटत होते. त्यातच अचानक कोरोनाची दुसरी लाट त्सुनामीसारखीच आली. २६ मार्च रुग्णसंख्या तीन लाख झाली. मात्र, पाच लाखांचा आकडा गाठण्यासाठी अवघे ५० दिवसांचा कालावधी लागल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
ठाणेसह कल्याण-डोंबिवलीत रुग्णवाढीची स्पर्धा
या दोन महापालिकांमध्ये ५० दिवसांत एक लाख नऊ हजारांच्या आसपास रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे दुसऱ्या लाटेत प्रभाव या महापालिकांमध्ये जास्त प्रमाणात दिसून आहे. ठामपात २६ मार्च ते १६ मे दरम्यान ५३ हजार ५२२ रुग्ण आढळले आहेत, तर केडीएमसीत ५५ हजार १५१, नवी मुंबईत ३४, हजार २४९, उल्हासनगर ६ हजार ६६३, भिवंडीत नऊ हजार ४९६, मीरा-भाईंदर १७ हजार ७४४, अंबरनाथ आठ हजार ६७७, बदलापूर आठ हजार ३८३ तर ग्रामीणमध्ये ११ हजार ५३९ रुग्ण दुसऱ्या लाटेतील ५० दिवसांत मिळाले आहेत.