ठाणे : ठाणे जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे रुग्ण दिवसागणिक झपाट्याने वाढू लागले आहेत. जिल्ह्यात आता या आजाराचे तब्बल २११ रुग्ण झाले असून त्यात २६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर नऊ रुग्णांना मुंबईतील रुग्णालयात हलविले असून ५७ रुग्णांना यशस्वी उपचार करून घरी सोडले आहे. त्यामुळे या आजाराची लक्षणे दिसल्यास तत्काळ उपचार करण्याचा सल्ला जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिला आहे. ठाणे शहरात या आजाराचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत.
कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये किंवा ज्यांना उच्च मधुमेह आहे अशांना या आजाराची लागण होण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे अशा रुग्णांनी अधिक काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाने केले, परंतु आता ज्यांची रोगप्रतिकारकशक्ती कमी आहे, अशांनादेखील त्याची लागण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळीच या आजारावर योग्य ते उपचार घेणे हाच यावरील मार्ग असल्याचे सांगितले जात आहे.
- नवी मुंबईत आठ तर केडीएमसीत १० मृत्यू
जिल्ह्यात सर्वाधिक ८५ रुग्ण हे ठाणे महापालिका हद्दीत आढळले आहेत. तर त्या खालोखाल नवी मुंबईत ५३, कल्याण-डोंबिवलीमध्ये ४४, उल्हासनगर ३, भिवंडी १, मीरा-भाईंदर २३, अंबरनाथ १, बदलापूर १ अशी या रुग्णांची संख्या आहे. सुदैवाने जिल्ह्याच्या ग्रामीण भागात या आजाराचा रुग्ण अद्यापही आढळून आलेला नाही. तर रोजच्या रोज जिल्ह्यात सरासरी १० च्या आसपास नवे रुग्ण या आजाराचे सापडत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर ठाण्यात सात, नवी मुंबईत आठ रुग्णांचा मृत्यू झाला असून कल्याणमध्ये १० आणि उल्हासनगरमधील एकाचा यात मृत्यू झाला आहे.