ठाणे : ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात दोन मनोरुग्णांच्या आत्महत्येप्रकरणी चार पुरुष परिचरांना तत्काळ निलंबित तर एक परिसेविका आणि एक अधिपरिचारिकेला प्रशासनाने सोमवारी कार्यमुक्त केल्यानंतर मंगळवारी महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनने प्रादेशिक मनोरुग्णालयावर धडक देऊन प्रशासनाला जाब विचारला. तसेच उपसंचालक कार्यालय, आरोग्य विभाग येथेही विचारणा करून ही कारवाई तत्काळ मागे घ्यावी अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला.मात्र, आम्ही केलेली कारवाई ही योग्यच असल्याचा दावा प्रशासन आणि उपसंचालक करीत आहेत. ते मनोरुग्ण असले तरी त्यांना असे मरू द्यायचे का? एका आठवड्यात दोन आत्महत्त्या होतात ही गंभीर बाब असल्याचे उपसंचालकांनी म्हटले आहे. मनोरुग्णालयातील पुरुष विभागात ११ सप्टेंबर रोजी संदीप पाटील यांनी तर दीपक चौरसिया यांनी १७ सप्टेंबर रोजी गळफास लावून आत्महत्त्या केली. याप्रकरणी परिसेविका कमल भोसले, अधिपरिचारिका वर्षा हिवाळे यांना कार्यमुक्त केले. तर परिचर सुरेश कुरकुटे, विनोद मरोठिया, तारासिंह चौहान आणि लेंबे यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यावर कर्तव्यात कसूर हा दोषारोप ठेवून ही कारवाई मनोरुग्णालय प्रशासनाने केली. या कारवाईला नर्सेस फेडरेशनने कडाडून विरोध केला आहे.भोसले आणि हिवाळे यांना चौकशीची संधी न देता या प्रकरणाला जबाबदार धरून कार्यमुक्त केल्याने हा अन्याय आहे असे फेडरेशनचे म्हणणे आहे. प्रशासनाने कार्यमुक्तची केलेली कारवाई ही एकतर्फी आहे. मनोरुग्णांची आत्महत्त्येचीच प्रवृत्ती असते. डॉक्टरांवर यात कोणतीही कारवाई झाली नाही. या दोघी दोषी असतील तर या प्रकरणात अधिक्षकापासूनच सर्वच दोषी आहे असे फेडरेशनच्या अध्यक्षा सुमन टिळेकर यांनी लोकमतला सांगितले. कार्यमुक्त म्हणजे काय? असा सवाल करून फेडरेशनने ही कारवाई रद्द करावी, अशी मागणी करून कार्यमुक्त ही कारवाई नियमांत नाही असा आरोपदेखील फेडरेशनने प्रशासनावर केला.एका मनोरुग्णाने गॉज बँडेजने तर दुसऱ्याने चादरीने आत्महत्त्या केली. अशा प्रकारे मनोरुग्ण आत्महत्त्या करायला लागले तर कसे होणार? ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. ही कारवाई वैद्यकीय अधिक्षकाने केली आहे. भोसले आणि हिवाळे या मनोरुग्णालयात काम करायला सक्षम नाही म्हणून तेथून त्यांना कार्यमुक्त करून उपसंचालक कार्यालयात पाठविले आहे. त्यांनी चौकशीत ढवळाढवळ करू नये म्हणून त्यांची चौकशी होईपर्यंत निलंबन आणि कार्यमुक्तची कारवाई वैद्यकीय अधिक्षकांनी केली आहे. त्यांची नियमाप्रमाणेच चौकशी करीत आहेत. ही घटना त्यांना गंभीर वाटत नसेल तर तो त्यांचा प्रॉब्लेम आहे. पुन्हा अशा घटना घडू नयेत.- डॉ. गौरी राठोड, उपसंचालक, आरोग्य विभागमी आॅफीसच्या कामानिमित्त मिटिंगला गेलो होतो. फेडरेशनने येताना माझी वेळ घेऊन यायला हवे होते. भोसले यांचा कामात हलगर्जीपणा होता. दीड महिना आधीच त्यांची दुसºया वॉर्डमध्ये बदली करण्यात आली होती. पण दबावतंत्र वापरून त्या आहे त्याच वॉर्डमध्ये थांबल्या. गॉज बँडेज हे कपाटात असते ती जबाबदारी तेथील नर्सेसची असते. मग ते गॉज बँडेज त्या मनोरुग्णाच्या हातात आले कसे? आम्ही केलली कारवाई ही योग्यच आहे.- डॉ. संजय बोदाडे, वैद्यकीय अधिक्षक
नर्सेस फेडरेशनची मनोरुग्णालयावर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 12:01 AM