कर्जत : बालकांचे कुपोषण कमी करण्यासाठी डॉ. अमृत कलाम अमृत आहार योजना राबविण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा फायदा कर्जत तालुक्यातील आदिवासी भागाला मोठ्या प्रमाणात झाला आहे. दरम्यान, अमृत आहार आणि व्हीसीडीसी योजना प्राधान्याने राबविल्याने ४५ गावातील कुपोषण मोठ्या प्रमाणात घटले आहे.राज्यात काही जिल्ह्यात कुपोषण मोठ्या प्रमाणात असून त्यावर नियंत्रण आणण्यासाठी राज्यातील १६ जिल्ह्यातील एकात्मिक बाल कल्याणच्या ४५ प्रकल्पात अमृत आहार योजना राबविण्याचा निर्णय घेतला. त्यात कर्जत तालुक्यातील ४५ गावातील १३५ अंगणवाड्या यांचा समावेश अमृत आहार योजनेत केला गेला. २०१६ मध्ये १३५ अंगणवाड्या मधील तब्बल ४१०४ बालकांना अतिरिक्त पोषण आहार देण्यास सुरुवात झाली. त्यांना अंडे किंवा फळे देतानाच कुपोषणाचे मूळ समजल्या जाणाऱ्या गरोदर माता यांच्या पोटी जन्मलेली बालके सुदृढ व्हावी यासाठी सकस आहार दिला जाऊ लागला. त्याचवेळी स्तनदा माता यांना देखील सकस आहार देण्यास सुरु वात झाल्याने कर्जत तालुक्यातील कुपोषण कमी होण्यास सुरु वात झाली. २०१८ मध्ये ही मोहीम आणखी प्रभावीपणे राबविताना १३५ अंगणवाड्यांमध्ये येणाºया ३८११ बालके आणि एक हजाराहून गरोदर महिला, स्तनदा माता यांना पोषण आणि सकस आहार दिला जात आहे.त्याचा फायदा आदिवासी आणि दुर्गम भागातील अंगणवाड्यांमध्ये येणाºया बालकांना सुदृढ होण्यात झाला आहे. १३५ अंगणवाड्यांमध्ये अमृत आहार योजना सुरू असताना अन्य भागातील कुपोषित बालके सुदृढ व्हावी यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण समितीच्या सभापती उमा मुंढे यांनी स्वत: पुढाकार घेऊन सावरगाव येथे व्हीसीडीसी केंद्र सुरू केले.तालुक्यात आज २३ अंगणवाड्यांत व्हीसीडीसी केंद्र आणि १३५ अंगणवाड्यात अमृत आहार योजना यामुळे कर्जत या कुपोषणाचा तालुका समजल्या जाणाºया तालुक्यातील कुपोषण खाली आले आहे.त्या ठिकाणी अशी केंद्रे सुरू होण्याआधी २३ अतितीव्र कुपोषित म्हणजे सॅम गटातील आणि १९ मध्यम कुपोषित म्हणजे मॅम श्रेणी मधील बालके होती. या दोन्ही योजना मुळे मॅम श्रेणीमध्ये असलेली सर्व १९ बालके कुपोषणमुक्त झाली आहेत तर सॅम श्रेणीमधील बालके यांची संख्या १३ पर्यंत खाली आली आहे.रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये कुपोषणावर नियंत्रण आणले असून अमृत आहार योजना आणि व्हीसीडीसी यांचा फायदा झाला आहे. व्हीसीडीसी सुरू करून जिल्ह्यातील काही तालुक्यात असलेले कुपोषण खाली आणण्यात आम्ही यशस्वी होत आहोत.- राजन सांबरे, प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला बालकल्याण विभाग, रायगड जिल्हा परिषद
अमृत आहार, व्हीसीडीसी योजनेमुळे कुपोषण घटले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 1:14 AM