ठाणो : ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या स्थगितीला उठवण्यासाठी ओबीसींच्या आकडेवारीची माहिती केंद्र सरकारने न्यायालयात सादर करून ओबीसी आरक्षण एक-दोन महिन्यात पूर्ववत करावे, यासाठी ठाणो जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शुक्रवारी आक्रोश तथा ठिय्या आंदोलन छेडण्यात येणार आहेत. परंतु, जिल्ह्यात लागू असलेला मनाई आदेश आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या आंदोलनास परवानगी नाकारली, असल्याची चर्चा आहे. मात्र, पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी आम्ही सर्व कार्यकर्ते आंदोलनावर ठाम आहोत, असे या आदोलनाचे नेते राज राजापूरकर यांनी लोकमतला सांगितले.
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला स्थगिती देण्यापूर्वी ओबीसींच्या आकडेवारीची माहिती केंद्र सरकारकडे न्यायालयाने मागितली, मात्र, केंद्रांने ही माहिती दिली नाही. त्यामुळे ओबीसींचे राजकीय अस्थित्व धोक्यात आल्याचा आरोप ओबीसी समाजाच्या नेत्यांकडून केला जात आहे. ओबीसी समाजाचा हा डेटा सुप्रिम कोर्टात सादर करून ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करावे, या मागणीसाठी शुक्रवारी सकाळी ओबीसी समाजाकडून ठाण्यात आक्रोश तथा ठिय्या आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे ठाणे-पालघर प्रमुख सुभाष देवरे यांनी पत्रकार परिषदेत दिली होती. मात्र, येथील ठाणेनगर पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारून कारवाई करण्याची नोटीस बजावल्याची जोरदार चर्चा आहे. परंतु जिल्ह्यातील सर्व आंदोलन छेडण्यावर आम्ही ठाम असल्याचे राजापूर कर यांनी सांगितले.
या संदर्भात ठाणेनगर पोलिसांशी संपर्क केला असता त्यांनी माहिती देण्यास टाळले.
.....
या आरक्षणाच्या स्थगितीवरून ओबीसी समाजामध्ये तीव्र संताप आहे. त्यामुळे आक्रोश आंदोलन छेडणारच आहे. त्यासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली काय आणि नोटीस बजावली काय, यास न जुमानता आम्ही जिल्ह्यातील कार्यकर्ते आंदोलन छेडणार आहे.
- राज राजापूरकर, ओबीसी समाजाचे नेते