ठाणे : सुप्रिम कोर्टाने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला स्थगिती दिली आहे. स्थगिती देण्यापूर्वी ओबीसींच्या आकडेवारीची माहिती केंद्र सरकारकडे मागितली आहे. मात्र, ती न दिल्यानेच ओबीसींचे राजकीय अस्तित्व धोक्यात आले आहे. केंद्र सरकारने हा डेटा उपलब्ध करून दिल्यास ओबीसी आरक्षणाचा प्रश्न येत्या एक-दोन महिन्यांत मार्गी लागेल, असे सांगून तो सुप्रिम कोर्टात सादर करून ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करावे, या मागणीसाठी येत्या शुक्रवारी (दि.२५) ओबीसी समाजाच्या वतीने ठाण्यात आक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे ठाणे-पालघर प्रमुख सुभाष देवरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या विरोधात ओबीसी समाजाने आक्रमक भूमिका घेतली असून, त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी ठाण्यात आक्रोश आंदोलन तथा ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे, याची माहिती देण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत देवरे बोलत होते. यावेळी विलास
(बापू) गायकर, दिलीप बारटक्के, राज राजापूरकर, गजानन चौधरी, नितीन पाटील, श्रीकांत गाडेकर, सचिन शिंदे, राहुल पिंगळे, रमाकांत पाटील, मंजूला ढाकी, राजनाथ यादव, मिलिंद बनकर, सुरेश पाटीलखेडे आदी विविध राजकीय पक्षांमध्ये कार्यरत असलेले ओबीसी नेते उपस्थित होते.