ठाणे : ठाणे स्टेशन परिसरातील पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी स्मार्टसिटीच्या माध्यमातून गावदेवी मैदानाखालीभूमिगत पार्किंगचे काम सध्या ठाणे महापालिका करीत आहे. या कामावर आता स्मार्ट सिटीच्या सल्लागारांनीच तीव्र आक्षेप घेतले आहेत. मंगळवारी झालेल्या स्मार्ट सिटीच्या बैठकीत नगररचना तज्ज्ञ तथा स्मार्ट सिटीच्या सल्लागार समितीच्या सदस्या सुलक्षणा महाजन यांनी या प्रकल्पावर कोट्यवधींचा खर्च करून काय उपयोग, त्याचा पालिकेला काय फायदा होणार, प्रकल्प उभारताना सल्लागारांना विश्वासात का घेतले गेले नाही, असे अनेक मुद्दे उपस्थित करून प्रशासनाची कानउघाडणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे स्टेशन परिसरात सध्या नौपाडा भागातील गावदेवी मैदानाखाली या पार्किंग प्लाझाचे काम सुरू आहे. परंतु, याबाबतीत यापूर्वी दक्ष नागरिक डॉ. महेश बेडेकर यांनी आक्षेप घेऊन न्यायालायत धावदेखील घेतली आहे. तसेच मागील महिन्यात काँग्रेसचे प्रदेश सदस्य राजेश जाधव यांनीही आक्षेप नोंदवून या कामामुळे आजूबाजूच्या इमारतींना मोठा धोका संभावणार असल्याचे सांगितले आहे. कोणतीही नैसर्गिक आपत्ती आल्यास ३ किमी. परिसरात मोकळे मैदान असावे, असेही नमूद केले आहे. परंतु, या कामामुळे मैदानाची तेवढी क्षमता राहील का, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली होती.निर्णयक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थितसुलक्षणा महाजन यांनी गावदेवी येथील भूमिगत पार्किंगच्या कामावर आक्षेप घेऊन हे काम करताना समिती सदस्यांसह आजूबाजूच्या रहिवाशांनादेखील विश्वासात घेण्यात आले नसल्याचे सांगितले. त्यातही हा प्रकल्प उभारत असताना त्याचा महापालिकेला काय फायदा होणार याची माहिती घेतलेली नाही. १०० ते १५० वाहनांकरिता कोट्यवधींचा निधी खर्च केला जाणार आहे. त्यातून वर्षाकाठी पालिका संबंधितांना तीन कोटीही देणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा नेमका उपयोग काय, असा सवाल करून त्यांनी प्रशासनाच्या निर्णयक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.ठाणे विकासात ‘दिवा’ नाही
कल्याण : दिवा परिसरात ठाणे महापालिकेकडून अनधिकृतपणे कचरा टाकला जात असून, बांधकामांवर सतत कारवाई केली जाते. दिवा -शीळ विभागातून महापालिकेत ११ नगरसेवक प्रतिनिधित्व करीत आहेत. परंतु, ठाणे स्मार्ट सिटी अंतर्गत घेतलेल्या कामात एक पैसाही दिवा विभागात वापरला गेला नाही. यावर नाराजी व्यक्त करून मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रशासनाला मंगळवारी खडेबोल सुनावले.मंगळवारी ठाणे शहर स्मार्ट सिटी सल्लागार समितीची आॅनलाइन बैठक घेण्यात आली. यावेळी पाटील यांनी प्रशासनाचे लक्ष वेधून दिवा शहरातील समस्या मांडल्या. दिवा डम्पिंग बंद करून तेथील खाडीकिनारा सुशोभीकरणाचा समावेश का केला नाही? दिवा स्टेशन परिसरात एलिव्हेटेड स्कायवॉक, क्लस्टरसारखी योजना राबवणे शक्य होते. सुनियोजित विकसित केल्यास येथून मोठ्या प्रमाणात महसूल मिळू शकतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले.