बदलापूर : शहरात पहिल्यांदाच भरवलेल्या आगरी महोत्सवात शुक्रवारी सैराटफेम आर्ची अर्थात रिंकू राजगुरू हिने लावलेल्या उपस्थितीमुळे प्रेक्षक ‘सैराट’ झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी सादर झालेल्या विविध नृत्याविष्कारांना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.बदलापुरातील क्रीडासंकुलात शुक्रवारपासून तीन दिवसांचा आगरी महोत्सव भरवण्यात आला आहे. आगरी समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष दीपक म्हात्रे, संयोजक वामन म्हात्रे, आगरी युवक संघटनेचे अध्यक्ष मयूर पिसेकर यांच्या पुढाकाराने या महोत्सव भरवण्यात आला आहे.शुक्रवारी उद्घाटनाच्या दिवशी सात हजार प्रेक्षक उपस्थित होते. या वेळी सादर झालेल्या ‘शिट्टी वाजली’ या कार्यक्रमात अनेक कलाकारांनी आपले नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. दीपाली सय्यद, केतकी पालव, मीरा जोशी, ऋतुजा शिंदे, सुकन्या काळण, संस्कृती बालगुडे या एकापेक्षा एक दिग्गज कलाकारांनी आपली कला सादर करत बदलापूरकरांनाही ठेका नाचण्यास भाग पाडले. कार्यक्रमस्थळी झालेली गर्दी ही आयोजकांनी अपेक्षित केलेल्या गर्दीपेक्षा जास्त होती. आगरी समाजाला एकत्रित करण्यासाठी हा महोत्सव असल्याने प्रत्येकाने आपल्या कुटंबासह या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती.भव्य कला मंच, आकर्षक रोषणाई, कार्यकर्त्यांचा मोठा ताफा, शिस्तबद्ध नियोजन या सर्व बाबतीत कार्यक्रम यशस्वी झाला. कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले ते ‘सैराट’ या चित्रपटातील अभिनेत्री रिंकू राजगुरूची उपस्थिती. आर्ची हिचा स्टेजवरील प्रवेश हा देखील अनोखाहोता.चंद्राच्या कोरावर बसून आकाशातून क्रेनच्या साहाय्याने तिला स्टेजवर आणण्यात आले. एवढेच नव्हे तर सैराट चित्रपटातील तिचा आवडता डायलॉगही या वेळी तिने सादर केला. आर्चीची एक झलक पाहण्यासाठी प्रत्येकजण आतुर झाला होता. तर, काहींनी भेटण्यासाठी गर्दी केली होती. मात्र, कार्यक्रमात व्यत्यय होणार नाही, याची आणि आर्चीला त्रास होणार नाही, याची काळजी आयोजकांनी घेतल्याने सामान्य प्रेक्षकांना तिला भेटता आले नाही.आगरी संस्कृतीचे दर्शनया कार्यक्रमाच्या निमित्ताने आगरी संस्कृतीचे दर्शन घडेल, असा देखावा या वेळी तयार करण्यात आला होता. तसेच प्रवेशद्वारही जेजुरीच्या गडावरील प्रवेशद्वाराप्रमाणे तयार करण्यात आले होते. त्यामुळे कार्यक्रमाची भव्यता वाढली होती. लहान मुलांच्या आकर्षणासाठी मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, मुरबाड या भागांतील आगरीबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. पहिल्यांदाच आगरी महोत्सव भरवला असला तरी नियोजनात मात्र कुठेच कमतरता भासली नाही.
आर्चीच्या उपस्थितीमुळे प्रेक्षक ‘सैराट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 3:28 AM