अंबरनाथ : अंबरनाथ येथे आपल्या माहेरी प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलेची घरी पोहोचण्याआधीच धावत्या लोकलमध्ये प्रसूती झाली. बदलापूर आणि अंबरनाथच्या मध्ये लोकल असतानाच या महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला. बाळ आणि बाळाची आई सुखरूप असून त्यांच्यावर पालिकेच्या छाया रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रत्नम्मा धर्मण्णा ही महिला कर्नाटकच्या गुलबर्गा येथून अंबरनाथला आपल्या माहेरी प्रसूतीसाठी येत होती. तिच्यासोबत तिची आई आणि वडीलदेखील होते. एक्स्प्रेस गाडीने हे तिघे कर्जतला पहाटे २ च्या सुमारास पोहोचले. कर्जतहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या पहिल्या लोकलमध्ये हे अंबरनाथच्या दिशेने निघाले. लोकलमध्ये बसल्यावर लगेचच रत्नम्मा यांना प्रसूतिवेदना सुरू झाल्या. पहाटेची वेळ असल्याने काय करावे, हे पालकांना सुचले नाही. त्यांनी तिला धीर दिला. मात्र, लोकलने बदलापूर स्टेशन सोडल्यावर गाडी अंबरनाथ स्थानकात येण्याआधीच या महिलेने एका मुलाला जन्म दिला. याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाला मिळताच त्यांनी बाळ आणि आई या दोघांना पालिकेच्या छाया रुग्णालयात उपचारासाठी हलवले. या दोघांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर प्रथमिक उपचार सुरू आहेत. (प्रतिनिधी)
बदलापूर-अंबरनाथदरम्यान धावत्या लोकलमध्ये प्रसूती
By admin | Published: February 22, 2017 6:04 AM