ठाणे : मागील १२ वर्षे केवळ कागदावर, पण चर्चेत असलेला मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव ते घोडबंदरमधील गायमुख चौपाटीपर्यंतचा कोस्टल रोड आता खऱ्या अर्थाने मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत. ठाणे महापालिकेने या रस्त्याचा आराखडा तयार करून एमएमआरडीएकडे पाठविला आहे. दुसरीकडे एमएमआरडीएने सीआरझेडच्या परवानग्या घेण्याच्या सूचना केल्याने, त्यानुसार पालिकेने कार्यवाही सुरू केली आहे. याशिवाय या मार्गात ज्या शासकीय जमिनी येणार आहेत, त्यांचे आरक्षण बदल किंवा इतर काही तांत्रिक अडचणी दूर होणार आहेत. त्यासाठी बुधवारी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि महापालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांच्यात सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महापालिकेतील आयुक्तांच्या दालनात ही बैठक पार पडल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. या बैठकीला पालिकेचे अधिकारी, प्रस्तावित मार्गाचे आर्किटेक्ट, तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. महापालिकेच्या माध्यमातून तयार करण्यात येत असलेला हा कोस्टल रोड सुमारे १३ किमीचा राहणार असून, काही ठिकाणी उन्नत तर काही ठिकाणी भुयारी मार्ग तयार केला जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. यासाठी १,२५१ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या मार्गामुळे घोडबंदरमधील मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अवजड वाहनांचा भार कमी होऊन, कोंडी सुटण्यास मदत होणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे. २००९ मध्ये कोस्टल रोडची चर्चा सुरु झाली होती, परंतु आता पालिकेने आराखडा तयार केला आहे. त्यामुळे आता हा मार्ग सुरू होण्याची आशा निर्माण झाली आहे. या मार्गावरून अवजड वाहने सोडली जाणार आहेत. पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रकल्पाचा आराखडा नुकताच तयार केला असून, तो मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला आहे. महापालिकेच्या विकास आराखड्यानुसार ४० ते ४५ मीटरचा हा आठपदरी रस्ता असणार आहे. त्यामध्ये अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका तयार करण्यात येणार आहे. १.१३ किमीचा उन्नत मार्ग, ५०० मीटरचा भुयारी मार्ग आणि वाघबिळ भागात जाण्यासाठी मार्गिका राहणार आहे. एकूण मार्गापैकी ७.२९ किमीचा मार्ग सीआरझेड भागातून जाणार आहे. या मार्गात सुमारे ४० टक्के सीआरझेड बाधीत होणार आहे. त्यामुळे ती कशी कुठे, कशा पद्धतीने बाधित होणार आहे, याचा आराखडा पालिकेने तयार केला असून, आता त्याची परवानगी घेण्यासाठी पालिकेने तयारी केली आहे.
दरम्यान, या मार्गात काही शासकीय जागाही येत आहेत. त्यांचे आरक्षण बदलावे लागणार असून, जमीन हस्तांतरण करणे यात महत्त्वाचे ठरणार आहे. त्या अनुषंगाने चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीत जमिनीचा ताबा देण्यात काही त्रुटी असतील, तर त्या दूर कशा करता येतील, या संदर्भात चर्चा झाली असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.
.....................
कोस्टल रोडसंदर्भात जमिनीचा ताबा देण्यात काही त्रुटी होत्या. त्या दूर कशा करता येतील, या संदर्भात सकारात्मक चर्चा झाली आहे.
राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी