- अजित मांडके ठाणे : एकीकडे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ठाणे महापालिका मोठमोठ्या प्रकल्पांची घोषणा करत आहे. परंतु, दुसरीकडे पालिकेच्या दिव्याखालीच अंधार असल्याची बाब समोर आली आहे. महापालिकेचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या दिवा परिसराची लोकसंख्या पाच लाखांच्या घरात असूनही तेथे एकही आरोग्य केंद्र नसल्याची बाब दिव्यात आलेल्या पुरानंतर प्रकर्षाने समोर आली आहे. दिव्यात अनधिकृत इमले उभे राहत आहेत, त्यांना इतर सोयीसुविधा दिल्या जात आहेत. येथील अनेक आरक्षणात फेरबदल केले जात आहेत. परंतु, असे असताना आरोग्य केंद्रासाठी जागाच नसल्याचा कांगावा पालिकेच्या संबंधित विभागाने केला आहे. त्यामुळे आता पालिकेच्या दिव्याखाली अंधार अशीच काहीशी गत झाली आहे.शुक्रवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने रविवारी रात्रीपर्यंत आपला जोर कायम ठेवला होता. सोमवारी पावसाने उसंत घेतली असली, तरीदेखील दिवा या भागात साचलेले पाणी मात्र काही ओसरलेले नाही. सोमवारी सायंकाळपासून ते ओसरण्यास सुरुवात झाली आहे. असे असले तरी आता पालिकेची कोणतीही आरोग्याची सोय नसल्याने या भागातील रहिवाशांसमोर आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे.या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून दिव्याच्या विकासासाठी उड्डाणपूल, रस्ता रुंदीकरण, टीएमटी डेपो आदींसह इतर सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. शिवाय, काही महत्त्वाच्या सुविधांसाठी या भागातील काही आरक्षणांमध्ये बदल करण्याचे प्रस्तावही मागील काही महासभांमध्ये मंजूर झाले आहेत. दुसरीकडे स्मार्ट सिटीचा जयघोष पालिकेकडून केला जात आहे. असे असताना पाच लाख लोकसंख्येला आरोग्य केंद्र नाही. ही स्मार्ट सिटीच्या दिशेने चालणाऱ्या ठाणे शहरासाठी अतिशय चिंतेची व खेदाची गोष्ट आहे. या भागात आरोग्य केंद्र सुरू व्हावे, यासाठी काही दक्ष नागरिकांनी तसेच काही राजकीय मंडळींनी वारंवार पालिकेकडे पत्रव्यवहार केला आहे. परंतु, अद्यापही पालिकेला जाग आली नसल्याचेच दिसत आहे. आता पूरपरिस्थिती निर्माण झाल्यानंतर येथील सत्ताधारी शिवसेनेच्या स्थानिक नगरसेवकांनाही या भागात आरोग्य केंद्र नसल्याचे शहाणपण आले आहे. त्यामुळेच आता काहींनी महापालिकेच्या आरोग्य विभागाला पत्र लिहून आरोग्य केंद्र सुरू करण्याची मागणी केली आहे.दुसरीकडे या भागात आरोग्य केंद्र सुरू करण्यासाठी जागाच नसल्याचा कांगावा पालिकेच्या संबंधित विभागाने केला आहे. या भागात अनधिकृत इमारती बांधण्यासाठी आणि त्याठिकाणी आपली खळगी भरून राजकीय पोळी भाजण्यासाठी जागा उपलब्ध आहेत. मात्र, आरोग्य केंद्रासाठी जागा नाही, हे पालिकेचे म्हणणे थोडे अजबच ठरणारे आहे.सध्या या भागातील रहिवाशांना खाजगी डॉक्टर किंवा अगदीच पालिकेचे आरोग्य केंद्र गाठायचे झाले, तर तीन ते चार किमीचे अंतर कापून खिशाला कात्री देऊन शीळ भागात जावे लागत आहे. त्यामुळे पालिकेला आता तरी जाग येईल का, असा सवाल येथील स्थानिक रहिवासी करू लागले आहेत.यासंदर्भात उपमहापौर तथा स्थानिक नगरसेवक रमाकांत मढवी यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकलेला नाही.स्थानिक नगरसेवक शैलेश पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, यासंदर्भात पालिकेला वारंवार पत्रव्यवहार केला असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, अद्यापही पालिकेला जाग आलेली नाही.आगासन येथे पोलीस स्टेशन, प्रभाग समिती कार्यालय आणि आरोग्य केंद्राचे आरक्षण टाकण्यात आले आहे. त्यानुसार, येत्या काळात ते काम सुरू होण्याची अपेक्षा त्यांनी त्यांनी व्यक्त केली.दिवा गावात आरोग्य केंद्र नाही, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, ते सुरू करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार, त्याची माहिती घेऊन पुढे काय कार्यवाही करायची, ते निश्चित केले जाईल.- डॉ. हरदास गुजर, आरोग्य अधिकारी, ठामपा
दिव्यात आरोग्य केंद्रच नसल्याचे उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2019 12:43 AM