मुरबाड : मुरबाड नगरपंचायतीने स्वच्छ आणि सुंदर शहर संकल्पना राबविण्यासाठी संपूर्ण शहरात प्लास्टिक बंदी केली असली तरी नगरपंचायतीचे संकुल व परिसरात असणाऱ्या घाणीच्या साम्राज्यामुळे डासांचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे विद्यार्थी, व्यापारी व कर्मचारी यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
मुरबाड नगर पंचायतीने शहरात ओल्या आणि सुक्या कचºयाचे नियोजन करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी शहरात ठिकठिकाणी कचरा कुंड्या ठेवल्या आहेत. त्या कुंड्यातील कचरा हा घंटागाडीतून नेऊन त्याची विल्हेवाट लावली जाते. मात्र प्लास्टिक पिशाव्यांमुळे अनेक ठिकाणी गटारे तुंबत असल्याने शहरात रोगराई पसरते. यासाठी प्लास्टिकचा वापर करणारे व्यापारी, फेरीवाल्यांवर दंडात्मक कारवाईची मोहीम सुरु केली आहे.
दरम्यान, नगरपंचायतीने सुरू केलेल्या मोहिमेत सर्वसामान्य नागरिकांवर प्लास्टिक वापरावर बंदी केली असली तरी या स्वच्छता मोहिमेला नगरपंचायत प्रशासनाने हरताळ फासला असल्याचा प्रकार समोर येत आहे. नगर पंचायतीच्या इमारतीत सार्वजनिक स्वच्छतागृहांची सोय नसल्याने नागरिक तसेच महिलांना लघुशंकेसाठी जिन्याच्या पर्यायाचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे नगर पंचायतीच्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दरम्यान, नगरपंचायतीच्या कारभारामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.