मीरा रोड : भाईंदर पश्चिमेला उत्तन मार्गावर श्री लक्ष्मी एन्कलेव्ह या इमारतीतील सदनिका विकून मोकळ्या झालेल्या विकासकाने रहिवाशांना जमिनीची व इमारतींची मालकी गृहनिर्माण संस्थेच्या नावाने करून दिली नाही म्हणून रहिवासी मनोजकुमार यादव यांच्या फिर्यादीवरून विकासक रमेश छेडा विरुद्ध भाईंदर पोलीस ठाण्यात 'मोफा' कायद्यानुसार शुक्रवारी गुन्हा दाखल केला.
यादव यांनी २०११ साली लक्ष्मी इंटरप्रायझेसचे रमेश छेडा यांच्याशी सदनिका खरेदीचा व्यवहार ११ लाख ७० हजारात नक्की केला होता. त्यावेळी २०१३ साली सदनिकेचा ताबा मिळेल, असे आश्वासन छेडा यांनी दिले होते. परंतु, प्रत्यक्षात त्यांनी २०१७ साली नोंदणीकृत करारनामा करून २०१८ साली सदनिकेचा ताबा दिला. सदनिकेचा ताबा तब्बल पाच वर्षे विलंबाने दिल्यानंतर छेडा यांनी २८ मे २०१८ रोजी गृहनिर्माण संस्थाची नोंदणी करून फेब्रुवारी २०१९ मध्ये कारभार रहिवाशांकडे सुपूर्द केला. परंतु, आजतागायत इमारतींची जमीन तसेच इमारतीची मालकी गृहनिर्माण संस्थेच्या नावे करून दिलेली नाही. विकासकाची ती जबाबदारी असूनदेखील जमिनीची मालकी गृहनिर्माण संस्थेच्या नावे न करून देता रहिवाशांची फसवणूक केल्याने हा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक मुगुट पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. अशा लबाड विकासकाविरुद्ध कारवाईसाठी पाठपुरावा करणार असल्याचे आम आदमी पार्टीने म्हटले आहे.
.....
मीरा-भाईंदरमध्ये बहुतांश बिल्डरांनी सदनिका खरेदीधारकांच्या नावे इमारतींच्या जमिनीची मालकी करून न देता मोठ्या प्रमाणात फसवणूक चालवली आहे. सदनिका वा गाळ्यांसाठी मनमानी पैसे घेऊन लोकांना विकून विकासकांनी बक्कळ फायदा कमावला. परंतु, आयुष्याची कमाई घरखरेदीत लावणाऱ्या हजारो सदनिकाधारकांना मात्र आजही जमिनीची मालकी गृहनिर्माण संस्थेच्या नावाने अनेक विकासकांनी करून दिलेली नाही.