ठाणे : ‘तान्हाजी’ या चित्रपटामध्ये चुलत्याच्या पात्राद्वारे नाभिक समाजाचे चहाडखोर असे चित्रण करण्यात आले आहे. या विकृत चित्रणातून नाभिक समाजाची बदनामी होत असून ही दृश्ये चित्रपटातून तातडीने वगळण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राष्ट्रीय जनसेवा पक्षाने केली आहे. सरकारचे या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी काळ्या फिती लावून शुक्रवारी राज्यभर निषेध नोंदविण्यात आला. शनिवारीही नाभिक समाजाच्या वतीने निषेध करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय जनसेवा पक्षाचे अध्यक्ष महावीर गाडेकर आणि संपर्कप्रमुख संजय पंडित यांनी दिली.‘तान्हाजी’ चित्रपटामध्ये नाभिक समाजातील ‘चुलत्या’ हा उदयभानकडे चहाड्या करतो, असे दर्शवले आहे. या बदनामीविरुद्ध मुख्यमंत्री ठाकरे यांना गुरुवारी निवेदन देण्यात आले आहे. भविष्यात अशा प्रकारचा अवमान नाभिक समाज कदापि सहन करणार नाही, असा इशाराही सरकारला देण्यात आला आहे. शुक्रवारी ठाणे, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, कल्याण-डोंबिवलीसह जिल्हाभर नाभिकबांधवांनी काळ्या फिती लावून काम केले. शनिवारीही अशाच प्रकारे निषेध नोंदवण्यात येणार आहे. यासोबतच समाजाच्या इतरही प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले आहे. नाभिक समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करावा. अॅट्रॉसिटी अॅक्टचे संरक्षण मिळावे. स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ सुरू करावे, गटई कामगारांच्या धर्तीवर सलून व्यावसायिकांना टपरी योजना मंजूर व्हावी, असंघटित कामगार योजनेंतर्गत शासनाच्या सर्व सवलती मिळाव्यात आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक वीर जिवाजी महाले यांच्या स्मारकाचे प्रतापगडावर भूमिपूजन करावे आदी मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे.या आहेत मागण्यास्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ सुरू करावे, गटई कामगारांच्या धर्तीवर सलून व्यावसायिकांना टपरी योजना मंजूर व्हावी, असंघटित कामगार योजनेंतर्गत शासनाच्या सर्व सवलती मिळाव्यात आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक वीर जिवाजी महाले यांच्या स्मारकाचे प्रतापगडावर भूमिपूजन करावे आदी मागण्यांचे निवेदन दिले.
‘तान्हाजी’ चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्ये वगळावीत, नाभिक समाजाची निदर्शने, मुख्यमंत्र्यांना निवेदन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 1:21 AM