पंकज पाटील
अंबरनाथ : नगरपालिकेची प्रशासकीय इमारत डबघाईला आलेली असतानाच आता या इमारतीला आणखीन एका महत्त्वाच्या समस्येने वेढले आहे. संपूर्ण पालिकेच्या इमारतीला वाळवी लागली असून, या वाळवीमुळे संपूर्ण कार्यालयातील महत्त्वाच्या फाइल्स खराब होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
अंबरनाथ नगरपालिकेची इमारत १९७८ला तयार करण्यात आली असून, ही इमारत आता धोकादायक स्थितीत आहे. पालिकेच्या वतीने नव्या प्रशासकीय इमारतीचे काम सुरू असले तरी अद्याप ते काम पूर्ण करण्यासाठी वर्षभराचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे नगरपालिकेला जुन्या इमारतीतूनच कामकाज करावे लागत आहे. मात्र जुन्या इमारतीमध्येदेखील आता नवनवीन समस्या उद्भवत आहेत. आता संपूर्ण पालिकेच्या कार्यालयाला वाळवी लागली असून, या वाळवीमुळे महत्त्वाच्या फाइल्सदेखील खराब झाल्या आहेत. अंबरनाथ नगरपरिषद येथील जन्म आणि मृत्यू नोंदणी कार्यालयात वाळवीचा सर्वाधिक प्रभाव असून, या वाळवीने कार्यालयातील निम्म्याहून अधिक फाइल्स नष्ट केल्या आहेत.
महत्त्वाच्या फाइल्स वाळवीच्या विळख्यात सापडल्याने त्या ठिकाणी काम करणारे अधिकारी आणि कर्मचारीदेखील चिंतित आहेत.
जन्म-मृत्यू नोंदणीसोबतच पालिकेतील बांधकाम विभाग, पाणीपुरवठा विभाग, अतिक्रमण विभाग, शिक्षण मंडळ, सामान्य प्रशासन विभाग, एवढेच नव्हे तर मुख्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयालादेखील वाळवी लागली आहे. तळ मजल्यावरील सर्व कार्यालयांना आणि तेथील अनेक फाइल्स, कागदपत्रांनाही वाळवी लागली आहे. हीच परिस्थिती पहिल्या मजल्यावरील आस्थापना विभाग, अकाउंट विभाग आणि नगरविकास विभागाच्या कार्यालयातदेखील दिसते आहे.
वाळवीचा प्रादुर्भाव वाढत असतानाही त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेकडून कोणतीही कार्यवाही केली जात नाही. ज्या अधिकाऱ्यांवर शहर विकासाची जबाबदारी आहे त्या अधिकाऱ्यांना स्वतःच्या कार्यालयातील वाळवीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेले नाही. त्यामुळे पालिकेच्या कामकाजाबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
येत्या काही दिवसात वाळवीवर नियंत्रण मिळवता न आल्यास पालिकेतील महत्त्वाची कागदपत्रे नष्ट होण्याची शक्यता आहे.