डोंबिवली : वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून ठाणे येथील कामगार राज्य विमा निगममध्ये सहायकपदावर कार्यरत असणाऱ्या अशोक पवार (वय ५८) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली. पवार यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत दोन वरिष्ठ अधिकारी आत्महत्येला कारणीभूत असल्याचे नमूद केले आहे. याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. डोंबिवली पश्चिमेकडील कोपर रोडवरील अशोकदीप सोसायटीत राहत होते. पवार हे गेले काही महिने मानसिक तणावात होते. पवार हे मार्चमध्ये सेवानिवृत्त होणार होते. परंतु, वरिष्ठांच्या त्रासामुळे त्यांनी ५ डिसेंबरला स्वेच्छानिवृत्तीचा अर्जही दिला होता. यावर, त्यांना बदलीच्या धमक्याही दिल्या जात होत्या, असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. मायग्रेनच्या त्रासाने त्रस्त असलेले पवार काही दिवस रुग्णालयात दाखल होते. त्यांनी अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या त्रासाबाबत वरिष्ठ पातळीवर तक्रारही केली. परंतु, त्याची दखल घेतली नाही. यामुळे आत्महत्या करावी लागली, असा आरोप त्यांचे बंधू प्रदीप यांनी केला आहे. दरम्यान, घटनास्थळी आढळलेल्या चिठ्ठीत पी.व्ही. पेवेकर आणि राजशेखर सिंग या अधिकाऱ्यांच्या नावांचा उल्लेख आहे. या अधिकाऱ्यांची चौकशी केली जाणार असून त्यादृष्टीने तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, संबंधितांवर कारवाई करून आम्हाला न्याय द्या, अशी भावना पवार यांची पत्नी वंदना यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली. (प्रतिनिधी)
वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून अधिकाऱ्याची आत्महत्या
By admin | Published: January 23, 2017 5:33 AM