ठाणे : सतत पडत असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर खासदार नरेश म्हस्के यांनी सोमवारी ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षास भेट देवून संपूर्ण यंत्रणेची पाहणी करुन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी आपत्कालीन विभागातील अधिकारी/ कर्मचारी यांना २४x७ सतर्क राहण्याचे निर्देश दिले असून अतिवृष्टीच्या काळात शहरात आपत्कालीन घटना घडल्यास तात्काळ महापालिकेची यंत्रणा मदतीसाठी पोहचेल या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचनाही दिल्या.
यावेळी खासदार नरेश म्हस्के यांच्यासमवेत शिवसेना ठाणे महापालिका क्षेत्र संघटक अशोक वैती, कोपरी पाचपाखाडी शिवसेना शहरप्रमुख राम रेपाळे, परिवहन सभापती विलास जोशी, माजी नगरसेवक संजय भोईर उपस्थित होते. तर प्रशासनाच्यावतीने अतिरिक्त आयुक्त १ संदीप माळवी, प्रशांत रोडे, उपायुक्त जी.जी. गोदेपुरे, सचिन पवार, आपत्कालीन व्यवस्थापन अधिकारी वाय.एम. तडवी आदी उपस्थित होते.
रविवार रात्रीपासून पावसाची संततधार सुरू असून शहरातील सखल भागात पाणी साचणाऱ्या ठिकाणांचा आढावा हस्के यांनी घेतला. शहरातील वंदना टॉकीज परिसर, जांभळी नाका येथील पेढ्या मारुती मंदिर परिसर या सखल भागात प्रशासनाने पंपची व्यवस्था केली असल्यामुळे पाणी साचले नसल्याचे आपत्कालीन विभागाकडून सांगण्यात आले. तसेच आपत्कालीन परिस्थितीत वेळेवर यंत्रणा पोहचवून आवश्यक उपाययोजना करण्यासाठी प्रभाग समिती निहाय पथके तैनात करण्यात आली असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
पावसाळ्यादरम्यान भरतीच्या वेळा पाहून ज्या दिवशी भरती असेल त्या दिवशी सर्व यंत्रणांनी सज्ज रहावे, शहरात कुठेही झाड पडल्याची घटना घडल्यास तातडीने पडलेले झाड उचलले जाईल या दृष्टीने कार्यवाही करणे तसेच आपत्कालीन विभागात येणाऱ्या प्रत्येक तक्रारीचे निवारण होईल या दृष्टीने कामकाज करण्याच्या सूचना यावेळी म्हस्के यांनी यावेळी दिल्या. तसेच यासाठी आवश्यक मनुष्यबळ पुरविण्याच्या सूचना देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या.
परिवहनच्या ताफ्यात मिनी बसची संख्या वाढवावी
पाहणी दौऱ्या दरम्यान झालेल्या बैठकीत खासदार नरेश म्हस्के यांनी परिवहन सेवेचा देखील आढावा घेतला. परिवहनच्या ताफ्यात नव्याने खरेदी करण्यात येणाऱ्या बसेसमध्ये मिनी बसची संख्या वाढवावी, जेणेकरुन शहरातील अंतर्गत भागात मिनी बसच्या माध्यमातून नागरिकांना सेवा देता येईल, याचा फायदा नागरिकांना होईलच परंतु परिवहनच्या उत्पन्नात देखील भर पडेल असे त्यांनी नमूद केले.
ठाणे रेल्वे स्थानकातून प्रवाशांच्या सोईसाठी बसेस
संततधार पावसामुळे रेल्वे सेवेवर परिणाम झाला होता. ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांची सकाळी गर्दी झाली होती. यावर मार्ग काढण्यासाठी खासदार नरेश म्हस्के यांनी परिवहन व्यवस्थापक बेहेरे यांना निर्देश देऊन ठाणे रेल्वे स्थानकावरून मुलुंड आणि इतर विविध ठिकाणी अनेक बसेस सोडल्या.