कल्याण : नो-पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या दुचाकीचे चलन फाडण्यास सांगितल्याच्या रागातून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा कल्याण-डोंबिवली जिल्हाध्यक्ष शरद गवळी आणि त्याच्या तीन साथीदारांनी वाहतूक पोलीस हवालदाराला मारहाण केल्याची घटना गुरुवारी चक्कीनाका परिसरात घडली. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी गवळीसह निवेद पुष्पराजन यांना अटक केली आहे.चक्कीनाका येथे अंकुश अंबरीत हे कर्तव्यावर असताना, गवळी, पुष्पराजन यांच्यासह आणखी दोन जण मोटारीतून आले. नो-पार्किंगमधून टोइंग केलेली दुचाकी सोडण्यास सांगणाºया पुष्पराजनला ‘चलन भरा व गाडी घेऊ न जा’ असे अंबरीत यांनी सांगितले. तर, माझ्या दुचाकीला खरचटले असून नुकसानभरपाई देण्याची मागणी करत पुष्पराजनने अंबरीत यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. त्याचवेळी या चौघांनी अंबरीत यांना धक्काबुक्की केली. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंंद्र शिरसाठ यांनी अंबरीत यांना त्यांच्या तावडीतून सोडवले. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात अंबरीत यांनी दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करून गवळी आणि पुष्पराजन यांना अटक केली.वाहतूक पोलिसांना शिवीगाळ, धक्काबुक्की यासारख्या घटना वाढत आहेत. त्यामुळे पोलिसांच्याच सुरक्षेचा प्रश्न समोर येत असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.>शिरसाठ आणि सांगळे यांना गवळीने ढकलून देत ‘मी अंगावर रॉकेल ओतून घेत तुम्हाला कामाला लावेन’ अशी धमकी देत चौकात गोंधळ घातला. त्यांनी चक्कीनाका चौकात आरडाओरडा करत सुमारे दोन तास गोंधळ घातला. त्यामुळे वाहतूक खोळंबल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पदाधिकाऱ्याची पोलिसाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 1:12 AM