मीरारोड - मीरा भाईंदरमध्ये एकेकाळी सत्तेत राहणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा पक्ष उभारी घेईल अशी आशा वाटत आहे. येत्या काही काळात पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड व आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली काही नगरसेवक व एका नेत्याचा प्रवेश होणार असा दावा पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
मीरा भाईंदरमध्ये माजी आमदार गिलबर्ट मेंडोन्सा राष्ट्रवादीत असताना महापालिकेत पक्षाची सत्ता होती. त्यात माजी मंत्री गणेश नाईक व समर्थकांचा सुद्धा सहभाग होता. २००२पासून पक्षाचे ३ महापौर झाले. आमदार होते पण २०१७ सालच्या पालिका निवडणुकीआधी पक्षाचे सर्व नगरसेवक भाजपा, शिवसेना व काँग्रेस मध्ये गेले. मेंडोन्सा सेनेत तर नाईक भाजपवासी झाले.
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा सहभाग असलेले महाविकास आघाडीशासन आल्यानंतर राष्ट्रवादीत काही प्रमाणात इनकमिंग सुरु झाले. माजी अध्यक्ष मोहन पाटील, आसिफ शेख, माजी महापौर निर्मला सावळे सह अंकुश मालुसरे आदी काही पदाधिकारी, माजी उपनगराध्यक्ष अरुण कदम पुन्हा राष्ट्रवादीत दाखल झाले. तसे असले तरी पदाधिकारी यांच्या नियुक्त्यांवरून पक्षात गटबाजी दिसून येते.
मेंडोन्सा आणि कुटुंबीय व त्यांच्या समर्थकांना राष्ट्रवादीत आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. स्वतः आव्हाड यांनी मेंडोन्सा यांना मागचे विसरून पक्षात पुन्हा येण्याचे आवाहन केले आहे. शिवायपूर्वी राष्ट्रवादीतून अन्य पक्षात गेलेल्या नगरसेवकांना सुद्धा स्वगृही परतण्याची हाक मारली जात आहे. त्यातच मेंडोन्सा हे शिवसेनेत फारसे सक्रिय दिसत नाहीत. त्यामुळे मेंडोन्सा पुन्हा राष्ट्रवादीत येणार असा दावा पक्षाच्या स्थानिक पदाधिकारी यांच्या कडून केला जात असला तरी मेंडोन्सा यांनी मात्र अजून तसे संकेत दिलेले नाहीत. परंतु राष्ट्रवादीचे प्रदेश पदाधिकारी मोहन पाटील , आसिफ शेख साज जिल्हाध्यक्ष मालुसरे, युवक अध्यक्ष साजिद पटेल आदी सातत्याने बडा नेता व काही आजी - माजी नगरसेवक पक्षात येणार असल्याचा दावा करत आहेत . त्यामुळे येणाऱ्या काळात खरे काय ? ते स्पष्ट होईल अशी शक्यता आहे.