डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे एप्रिलमध्ये दिसून आले. नव्याने आढळणाऱ्या कोरोना रुग्णांचा आकडा काहीसा कमी झाला असला तरी मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान, कोरोनाचे संक्रमण थांबावे यासाठी राज्य सरकारच्या आदेशानुसार केडीएमसीने लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये कडक निर्बंधांचे उल्लंघन होताना डोंबिवलीत पाहायला मिळत आहे. भाजीपाला विक्री, मच्छी-मटण विक्रेते यांना विक्रीसाठी ठराविक कालावधी ठरवून दिला असताना त्यानंतरही त्यांचे धंदे बिनदिक्कत सुरू राहत असून यात नागरिकही बेफिकिरीने वागत असल्याने कोरोनाचे संक्रमण रोखायचे तरी कसे? असा प्रश्न सरकारी यंत्रणांना पडला आहे.
एप्रिलमध्ये कोरोनाचे तब्बल ४१ हजार ५५१ नवे रुग्ण आढळले आहेत. ३७ हजार ६२० रुग्ण महिनाभरात उपचाराअंती बरे झाले. मात्र, १७८ कोरोनाबाधितांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या कोरोना रुग्ण नव्याने आढळून येण्याच्या आकड्यात काहीशी घट झाली आहे. मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. एप्रिलमध्ये एका दिवसात १३ जणांचा मृत्यू झाला होता. हा आजवरचा सर्वोच्च आकडा आहे. सध्या मृतांचे प्रमाण आठ ते १० च्या आसपास आहे. दरम्यान, सरकारने लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला आहे. लादलेले कडक निर्बंध कायम ठेवले आहेत. मात्र, याचा डोंबिवलीत काहीच परिणाम दिसत नाही. सकाळी ११ वाजल्यानंतरही धंदा चालू ठेवणारे भाजीपाला विक्रेते, फेरीवाले, मच्छी-मटण विक्रेते यांच्यावर कारवाई करूनही उघड्यावर किंवा छुप्या पद्धतीने व्यवसाय करत आहेत. त्याठिकाणी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत असून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. अनेक जण विनाकारण फिरत असल्यामुळे रस्त्यांवर वाहनांची वर्दळही वाढली आहे. पश्चिमेतील बावनचाळ, पूर्वेतील इंदिरा चौक, मानपाडा चार रस्ता, पाथर्ली शेलार चौक, घरडा सर्कल येथे पोलिसांकडून नाकाबंदी लावण्यात आली आहे. त्यानंतरही नागरिकांचे उल्लंघन सुरूच आहे.
---------------------------------------------
वॉक करणाऱ्यांचा बेजबाबदारपणा
काही बेजबाबदार नागरिक सकाळी व संध्याकाळी वॉकच्या नावाखाली सर्रास फिरत आहेत. काहींच्या ताेंडावर मास्कही नसतो. हे चित्र डोंबिवली पश्चिमेतील खाडीकिनारे, भागशाळा मैदान आणि पूर्वेतील उंबार्ली टेकडी तसेच ठाकुर्लीतील ९० फूट रोड, समांतर रस्त्यावर नेहमी पाहायला मिळते. मॉर्निंग वॉक करणाऱ्यांवर मीरा-भाईंदरमध्ये कारवाईचा बडगा नुकताच तेथील मनपा आणि पोलिसांच्या वतीने उगारण्यात आला आहे. डोंबिवलीही कोरोनाचा हॉटस्पॉट झाली आहे. त्यामुळे येथेही अशाच प्रकारे कारवाई होऊन संक्रमण रोखणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.
----------------------------------------------
फोटो कॅप्शन.
डाेंबिवली येथे सकाळच्या सत्रात खरेदीसाठी नागरिकांनी केलेली गर्दी. (छाया : प्रशांत माने)