उल्हासनगर : चोरट्यानी चक्क विद्युत मंडळाच्या कार्यरत ट्रान्सफॉर्मरमधून ऑईल व तांब्याच्या कॉईलची चोरी केली. याप्रकरणी हिललाईन पोलिसांनी अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काकडवाल गावाशेजारी विद्युत मंडळाचे ट्रान्सफॉर्मर बसविले असून येथुनच गावाला विजेचा पुरवठा होतो. सोमवारी सकाळी गावचा वीजपुरवठा खंडित झाल्याने, गावकऱ्यांनी ट्रान्सफॉर्मरकडे धाव घेऊन, विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. वायरमन शिवाजी भोईर यांनी ट्रान्सपोर्टरची तपासणी केली असता ऑईल व तांब्याची कॉईल चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी याबाबत वरिष्ठांना माहिती देऊन हिललाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
चोरट्यानी ट्रान्सफॉर्मरमधून चक्क 20 हजार किंमतीचे 400 लिटर ऑईल व 15 हजार किमतीची तांब्याची कॉईल चोरून नेली. यापूर्वीही असे प्रकार ग्रामीण भागात घडले आहे. अज्ञात चोराविरोधात हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.