लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी: भिवंडीतील मुंबई - नाशिक महार्गारावर ऑईल टँकर व ट्रकमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली आहे. या अपघातात ऑईल टँकर पलटी झाल्याने महामार्गावर ऑईल सांडल्याने सुमारे ४ किलो मीटरपर्यत वाहतूक ठप्प झाली होती. तर या अपघात टँकर चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रांजनोणी नाक्यावरील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघाताची नोंद कोनगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
मुंबई - नाशिक महामार्गावरील भिवंडी तालुक्यातील पिपंळास फाटा येथे शुक्रवारी ऑईल टँकर व ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातामुळे ऑईल टँकर महामार्गावर पलटी झाल्याने त्यामधील ऑईल मार्गावर पसरल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलीस व कोनगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन क्रेनच्या साहाय्याने टँकर व ट्रक महामार्गाच्या कडेला उचलून ठेवले. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून अग्निशमन दलाच्या कार्यलयात घटनेची माहिती देताच, काही वेळातच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन डंपरच्या साहाय्याने महामार्गावर ऑईल पसरलेल्या ठिकाणी माती टाकून अपघात टाळण्याचा प्रयत्न केला.
या अपघातामुळे दुपारपर्यंत या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. आता मात्र धीम्या गतीने वाहनचालक वाहने घेऊन जात असल्याने वाहतूक सुरळीत करण्यासाठी सुमारे २ ते ३ तासाचा कालावधी लागला.