भातसानगर : शहापूर तालुक्यात तुते या गावातील शेतकऱ्याने आपल्या शेतीत ठिबक पद्धतीबरोबरच मर्चिंग पद्धतीने भेंडी उत्पादन घेण्यास दीड महिन्यापासून सुरुवात केली आहे. यामधून आपल्याला अधिक फायदा झाल्याचे या शेतकऱ्याचे म्हणणे आहे.
आज बदलत्या हवामानाचा जसा मानवी जीवनावर विपरीत परिणाम झाला आहे तसाच तो शेतीवरही झाला असून, याचा परिणाम म्हणजे आज बियाणे कुजणे, रोपांची आवश्यक वाढ न होणे, रोपांवर बुरशी येणे, उत्पादन घटणे, रोपे जळून जाणे यामुळे उत्पादन घटल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. मात्र, तरीही शेतकरी आपल्या पद्धतीने उत्पादन घेत आहेत. तुते येथील शेतकऱ्याने आपल्या शेतीत केलेला यशस्वी प्रयोग निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. या गावातून सर्वाधिक भेंडी ही परदेशात जाते. या भेंडीचे उत्पादन घेत असताना तिला सहा ते सात दिवसांतून सरी पद्धतीने भरपूर पाणी दिले जाते, त्यामुळे अधिक प्रमाणात पाणी हे उन्हाने तापून वाफेत रूपांतर होऊन जाते.
काही प्रमाणात पाणी पुढे जाताना जमिनीतच सुकून जाते. फार थोडे पाणी हे त्या रोपाला मिळते. तर अधिक पाणी फुकट जाते. मात्र तुते गावातील विनोद पांढरे यांनी एक एकर शेतीत भेंडीची लागवड केली असून ठिबक व मर्चिंग पद्धतीचा वापर केल्याने पाण्याचा अपव्यय होत नाही. रोपालाच पाणी मिळत असल्याने रोपाची वाढ झपाट्याने होऊन अधिक पीक येते. गवत येत नसल्याने मजुरीही वाचते. आज या शेतकऱ्याने गेल्या दोन महिन्यांत आपल्या झालेल्या खर्चासह लाख रुपयांपर्यंत नफा मिळविला आहे. त्यामुळे अशा पद्धतीने इतरांनी उत्पन्न घेतल्यास फायदा होईल, असे त्यांचे मत आहे.