ठाणे : ठाणेरेल्वेस्थानकातील फलाट क्रमांक-२ आणि १० नंबरला जोडणारा कल्याणकडील जुना पूल दुरुस्तीच्या नावाखाली एकतर २१ दिवस उशिरा बंद केला. मात्र, दुरुस्तीचे काम हाती घेतल्यानंतर ५० दिवसांत ठेकेदाराने या पुलाच्या फलाट क्रमांक २ ते ५ चे नादुरुस्त बांधकाम पाडण्याशिवाय कोणतेही काम पूर्ण न करता ते अर्धवट सोडले आहे. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याने तो लवकरात लवकर सुरू करावा, अशी मागणी होत आहे. ठाणे रेल्वे प्रशासनाला हे काम का बंद आहे, याचे स्पष्टीकरण अद्यापही ठेकेदाराकडून मिळाले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.ठाणे स्थानकात येजा करण्यासाठी पाच पूल आहेत. यात सीएसएमटी आणि कल्याणच्या दिशेकडे प्रत्येकी एकेक पादचारी पूल आहे. १९७२ साली प्रवाशांसाठी सुरू केलेल्या कल्याणकडील जुन्या पुलाच्या दुरुस्तीचे काम २ फेब्रुवारीपासून दोन टप्प्यांत केले जाणार असल्याने तो तब्बल ६९ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. पहिले २० दिवस फलाट क्रमांक- २, ३, ४ तसेच पुढील ४९ दिवस फलाट क्रमांक- ५, ६, ७, ८, ९, १० असे बंद ठेवण्याचे जाहीर केले होते.पुलाच्या दुरुस्तीचे काम २ फेब्रुवारीऐवजी २३ फेब्रुवारीला हाती घेतल्यानंतर पहिल्या टप्प्यात फलाट क्रमांक २, ३, ४, ५ चे काम अर्धवट ठेवून तो बंद ठेवला. ठेकेदाराने पुलाचे नादुरुस्त बांधकाम पाडलेही. परंतु, त्यानंतर पुढील कामाला ग्रहण लागल्याने ते सद्य:स्थितीत बंद ठेवले आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या पहिल्या टप्प्याची मुदत संपली आहे. तसेच दुरुस्तीचे काम सुरू होऊन येत्या २३ एप्रिल रोजी दोन महिने होत असताना ते नेमके कधी पूर्ण होईल, असा सवाल आता प्रवासी विचारत आहेत. त्यातून गैरसोय टाळण्यासाठी पावसाळ्यापूर्वी ते मार्गी लावावे, अशी मागणीही होत आहे.तो जिना कशालाबंद ठेवण्यात येणाऱ्या पुलाला अप-डाउन असा सरकता जिना आहे. तसेच हा पूल थेट सॅटीसलाही जोडलेला असल्याने स्थानकातून थेट प्रवाशांना बाहेर जाता येते. त्यातच या पुलावरून चढ आणि उतारासाठी सुरू असलेला सरकता जिना बंद न ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. परंतु, त्याचा काय उपयोग, असा सवाल प्रवाशांकडून केला जात आहे.
ठाणे स्थानकात जुन्या पुलाच्या दुरुस्तीची रखडपट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 2:43 AM