डोंबिवली: प्रवासी हेच आमचे दैवत असे मानले तरीही प्रचंड ठिकठिकाणच्या रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडल्याने रिक्षाचालक त्रस्त झाले आहेत. महापालिका प्रशासन काही करत नाही, ना लोकप्रतिनिधी त्यामुळे रिक्षाचालकांनीच कंटाळून खड्डे बुजवण्याचा निर्णय घेत जुनी डोंबिवली येथील रिक्षा चालकांनी गुरुवारी संध्याकाळी खड्डे बुजवले.२५ वर्षे जुना असलेल्या स्टँडमधील सुमारे २०० रिक्षा चालक अनेक वर्षांपासून व्यवसाय करतात. त्यामुळे परिसरातील हजारो प्रवासी त्यांच्या परिचयाचे आहेत. पण रस्त्यांवरील खड्डेच प्रचंड असल्याने प्रवाशांना समाधानकारक सुविधा देता येत नसल्याची खंत स्टँड प्रमुख विलास पंडित, मॅक्सी तिरोडकर, प्रकाश जनकर, प्रकाश बागडे, सुरेश पवार, अॅनेक्स फर्नांडीस, अरुण कोचरेकर यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.ते म्हणाले की, खड्ड्यांची दयनीय अवस्था ही काही यंदाची नाही, तो प्रश्न अनेक वर्षे सुटलेलाच नाही. त्याकडे लोकप्रतिनिधी का दुर्लक्ष करतात माहित नाही. पण समस्या आहे हे उघड आहे. त्यामुळे गरोदर माता, ज्येष्ठ नागरिक, बालक हे प्रवासी म्हणुन आले की पोटात गोळा येतो. खड्यात रिक्षा गेली आणि त्यांना काही झाले तर काय करायचे हा मोठा ताण असल्याचे कोचरेकर सांगतात. पंडित म्हणाले की, तक्रारी तरी किती करायच्या. रिक्षा चालकांचे अंग दुखते, त्यांना कंबर दुखीचा त्रास होत आहे. अनेकांना वयोमानाप्रमाणे छातीचे विकार आहेत. अशा अवस्थेत खड्डयांमधून रिक्षा गेल्यावर गाडीचे नुकसान होते, शरिराची हेळसांड होते. त्यामुळे अखेरीस आम्हीच खड्डे बुजवण्याचा निर्णय घेतला. गुरुवारपासून साधारण २० खड्डे बुजवले असून त्यामध्ये ्नजोंधळे शाळा परिसर, देवी चौक या मार्गावरील मोठे खड्डे बुजवले. परंतू जुनी डोंबिवली ते गिरजामाता मंदिर परिसरात १० इंचाचे खड्डे झाले आहेत, ते भरणे कठीण आहे.जेथे खड्डे बुवले त्यात परिसरातील डेब्रिज टाकण्यात आले. डेब्रीज टाकुन समस्या सुटणार नाही हे माहिती आहे, पण तरीही प्रशासनाला समस्या दिसावी, आणि प्रवाशांना आम्ही भाडे का नाकारतो हे समजावे यासाठी हा प्रयत्न असल्याचे रिक्षाचालकांनी सांगितले. वाहतूक विभाग, आरटीओ अधिकारी यांनीही या समस्ये कडे लक्ष द्यावे आणि महापालिका प्रशासनाला रस्ते दुरुस्त करण्याचे आवाहन करावे अशी मागणीही त्यांनी केली. कोचरेकर आणि पंडित यांनी खड्डे बुजवण्यासाठी आणि जनजागृतीसाठी पुढाकार घेतला असून सहकारी रिक्षा चालकांनी त्यांना सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानूसार शुक्रवारी जेथे जास्त खड्डा मोठा आहे तो बुजवण्यासाठी सामान गोळा करणार असल्याचे ते म्हणाले. प्रशासनाने चांगले रस्ते द्यावेत, जेणेकरुन ग्राहकांना सुविधा देता येईल, आमचे आरोग्य राखले जाईल असेही रिक्षाचालक म्हणाले.
पश्चिमेकडील जुन्या डोंबिवलीत रिक्षाचालकांनीच बुजवले खड्डे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2019 4:52 PM