मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील जुन्या ३ सिमेन्स कंपनीच्या लोकल हार्बर मार्गावर चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे हार्बर मार्गावरील जुन्या रेट्रोफिटेड बनावटीच्या लोकल बाद होणार असून, या भंगारात जाण्याची शक्यता आहे.
मध्य रेल्वे मार्गावर तीन बंबार्डियर लोकल येणार आहेत. यातील एक लोकल मध्य रेल्वे मार्गावर दाखल झाली असून, अन्य दोन लोकल मान्सूनमध्ये येणार आहेत. त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील तीन सीमेन्स कंपनीच्या लोकल हार्बर मार्गावर चालविण्यात येणार आहेत.हार्बर मार्गावर सध्या ४० लोकल असून, या लोकलच्या ६१२ फेऱ्या चालविण्यात येतात. यातील ३६ लोकल सिमेन्सच्या असून चार रेट्रोफिटेडच्या आहेत. मात्र, रेट्रोफिटेडच्या लोकलमधून प्रवास करताना प्रवाशांना त्रासदायक होत होते. त्यामुळे प्रवाशांच्या अनेक तक्रारी येत होत्या. त्यामुळे हार्बर मार्गावर सर्व लोकल सिमेन्स कंपनीच्या चालविण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मान्सूनमध्ये नवीन ३ सिमेन्स लोकल दाखल होणार आहे. त्यामुळे पावसाळ्यात लोकलला मिळणारा ब्रेक यंदा मिळणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पावसाळ्यात रुळावर पाणी साचून रेट्रोफिटेड कंपनीच्या लोकल ठप्प होतात. त्यामानाने सीमेन्स बनावटीच्या लोकल साचलेल्या पाण्यातून चालविता येऊ शकतात. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुलभ होणार आहे. सिमेन्स लोकलची बांधणी आधुनिक पद्धतीने असल्यामुळे खिडक्या आणि दरवाजे मोठ्या आकाराचे असणार आहेत. या लोकलचा वेग ८० ते १०० किमी असल्याने हार्बर मार्गावरील दोन स्थानकातील अंतर कमी होईल. हार्बर मार्गावरील प्रवाशांना गृहीत धरले जाते. पश्चिम मार्गावरील वापरलेल्या लोकल मध्य मार्गावर वापरण्यात येतात. त्यानंतर हार्बर मार्गावर जुन्या झालेल्या लोकल चालविण्यात येतात. त्यामुळे हार्बर मार्गावरील प्रवाशांना दुर्लक्षित केले जाते, अशी हार्बर मार्गावरील प्रवाशांनी प्रतिक्रिया दिली.