जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे: लुईसवाडी भागात कुसूम मधुकर ससाणे या ६० वर्षीय वृद्धेचा स्मृतीभ्रंश झाल्यामुळे तिला पत्ता किंवा नातेवाईकांचे फोन क्रमांकही सांगता येत नव्हते. केवळ कुर्ला- मुबईत राहते, इतकीच जुजबी माहिती तिने दिल्यानंतर वागळे इस्टेट पोलिसांनी तिची आणि कल्याण इथे राहणारा तिचा मुलगा सचिन ससाणे यांची नुकतीच पुनर्भेट घडवून आणली. आपली आई पुन्हा सुखरुपरित्या मिळाल्याने सचिन यांना आपल्या भावना अनावर झाल्या होत्या. वागळे इस्टेट, लुईसवाडी भागात कुसुम ही वृद्ध महिला ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास विमनस्क अवस्थेमध्ये फिरतांना आढळली. तिला पत्ता आणि नातेवाईकांचे फोन क्रमांकही सांगता येत नव्हते. ती केवळ कुर्ला मुंबई येथे राहते इतकीच जुजबी माहिती सांगत होती. याची वरिष्ठ पोलीस निरीक्षक अफजल पठाण यांनी गांभीर्याने दखल घेतली. पोलीस उपनिरीक्षक अश्विनी जाधव, पोलीस हवालदार संजय आगवणे, राकेश घोसाळकर आणि पोलीस नाईक सुनिता गीते आदींच्या पथकाने ठाणे तसेच मुंबईतील कुर्ला आणि नेहरूनगर आदी पोलीस ठाण्यांशी संपर्क साधून तिची माहिती दिली. परंतू कोणतीच माहिती उपलब्ध होत नव्हती. त्यानंतर १० फेब्रुवारी रोजी पुन्हा तिला विश्वासात घेऊन तिच्या नातेवाईकांची माहिती घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. तेंव्हा तिने सासू गजराबाई ही कुर्ला मार्केटमध्ये भाजी विक्रीचा व्यवसाय करते, असे सांगितले. या माहितीच्या आधारे कुर्ला मार्केटमधील बीट अमलदारांशी संपर्क साधून माहिती मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच पती घाटकोपर येथे महानगरपालिकेत पाणी खात्यात कामाला असल्याचेही तिने सांगितले. या माहितीच्या आधारे नाशिक, मुंबई, उल्हासनगर आणि ठाणे येथील पाटबंधारे विभागातही या पथकाने चौकशी केली. त्यानंतर तिचे पती मधुकर ससाणे हे मुंबई महापालिकेच्या घाटकोपर विभागातील पाणी खात्यात नोकरीला होते. त्यांचे निधन झाले आहे, अशी माहिती घाटकोपर येथील पाणी पुरवठा विभागातील एका महिलेने दिली. त्यावरुन तिचा मुलगा सचिन मधुकर ससाने याचा मोबाईल क्रमांक मिळवून त्याच्याशी पोलिसांनी संपर्क केला. तेंव्हा ही आपलीच आई असून ती ८ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ८.३० वाजल्यापासून घरात काहीएक न सांगता निघून गेल्याचेही सचिन याने सांगितले. आपण कल्याण येथे वास्तव्याला असून २०१७ पासून आईची मानसिक स्थिती ठीक नाही. तिच्यावर एका खासगी रु ग्णालयात उपचार करण्यात येत असल्याचेही त्याने सांगितले. तिचा कल्याणसह उल्हासनगर आणि अंबरनाथ आदी भागात शोध घेऊनही ती मिळाली नव्हती. पोलिसांनी पुन्हा माय लेकाची भेट घडवून आणल्यामुळे सचिन आणि त्याच्या आईनेही पोलिसांचे आभार मानले.